Breaking News
प्रभात ट्रस्टचा अभिनव उपक्रम ; 30 रुपयाला पर्यावरण पुरक राखी उपलब्ध
नवी मुंबई ः श्रावणामध्ये अनेक सण साजरे होतात. तील एक सण म्हणजे भाऊ-बहिनीचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधन. राखी बांधताना बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन भाऊ देत असतो. याचनिमित्ताने पर्यावरणाच्या, निसर्गाच्या संर्वधनासाठी पृथ्वीरुपी बहिनीचे रक्षण करण्यासाठी प्रभात सामाजिक संस्थेमार्फत आकर्षक आणि परवडणारी अशी बीज राखी बाजारात दाखल झाली आहे. यामुळे रक्षाबंधन, निसर्ग संवर्धन आणि महिला सक्षमीकरण हे हेतू साध्य होत असल्याने त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रक्षबंधनासाठी बाजारात दरवर्षी आकर्षक राख्या दाखल होत असतात. परंतु, यातील बहुतांशी राख्या प्लॅस्टिकपासून बनवल्या असल्याने सण साजरा झाल्यावर त्या इतरत्र पडून निसर्गाची हानी होते. वर्षानुवर्ष प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाचे नुकसान होत असून मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होतो. यावर तोडगा म्हणून आपल्या नाविन्यपुर्ण उपक्रमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी नेहमीच कार्यरत असणाऱ्या घणसोली येथील प्रभात ट्रस्टच्या माध्यमातून बीज राखी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून नवी मुंबईत प्रभात मार्फत अनेक सामाजिक कार्यक्रम, पर्यावरणाशी संबंधित उपक्रम राबवण्यात येत आहेत. माझी वसुंधरा या शासकीय उपक्रमाअंतर्गत सहभागी होऊन प्रभात नेहमीच नवी मुंबई पालिकेला सहकार्य करते. बीज मोदक ही संकल्पना यशस्वी झाल्यानंतर माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत प्रभातच्यावतीने ‘बीज राखीचे रक्षाबंधन, पर्यावरणाचे करुया रक्षण' या ब्रीजवाक्याने बीज राखी हा उपक्रम सुरु केला आहे.
19 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या रक्षबंधनासाठी प्रभातमध्ये राखी बनवण्याची लगबग सुरु झाली आहे. लालमाती, शेणखत, विघटन होणारी कापडाची लेस आणि रेशमी धागा अशा पर्यावरणपुरक वस्तु वापरुन आकर्षक राखी बनवली जात आहे. यामध्ये निलगिरी आणि बाभुळ अशा निसर्गात सहजपद्धतीने वाढणाऱ्या झाडांच्या बिया रोवण्यात आल्या आहेत. जेणेकरुन ही राखी रक्षाबंधन साजरा करुन झाल्यावर कुठेही पडली तरी यातून पर्यावरणाला हानी पोहचणार नाही उलट यातून नवीन रोप निर्माण होण्यास मदत होणार आहे. या राखीची किमंत केवळ 30 रुपये आहे. तसेच ही राखी कोणत्याही मोठ्या कंपनीत बनवली जात नसून गरजू, घरकाम करणाऱ्या, नाका कामगार बिगारी कामागार असणाऱ्या महिला तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून बनवल्या जातात. या महिलांना याचे प्रशिक्षण देवून हातांनी या राख्या बनवल्या जातात. त्यामुळे हाताला काम आणि त्याचे योग्य दाम त्यांना मिळत असल्याने महिलांचे सक्षमीकरणासही हातभार लागतो. सेक्टर 16, घणसोली येथील प्रभात ट्रस्टच्या कार्यालयात ही राखी उपलब्ध होत आहे. या पर्यावरणपुरक राख्यांमुळे भाऊ बहिणीच्या रक्षबंधन या सणांचा विधायक उद्देश साध्य होईलच शिवाय निसर्ग संवर्धन होईल. त्यामुळे या अनोख्या बीज राखी या संकल्पनेद्वारे रक्षाबंधन, निसर्ग संवर्धन आणि महिला सक्षमीकरण असा तिहेरी हेतु साध्य होत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस