Breaking News
घणसोली स्टेशनरोडवर वाहतुक पोलीस नेमण्याची मागणी
नवी मुंबई ः घणसोली रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर सिग्नल नसल्याने सायंकाळी प्रचंड वाहतुक कोंडी होऊन ध्वनी व वायु प्रदुषण होते. गाड्यांचा चक्काजाम होत असल्याने नागरिकांना पायी चालणेही अवघड होऊन जाते. त्यामुळे अनेकदा लहान अपघात व त्यातून वाद निर्माण होतात. त्यामुळे याठिकाणी सिग्नल बसवून वाहतुक पोलीस नियुक्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
घणसोली रेल्वे स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर येणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांची व प्रवाशांची सतत वर्दळ असते. तेथेच रिक्षा थांबे असल्याने गर्दीच्या वेळी दाटीवाटीतून वाट शोधावी लागते. या रस्त्यावर मुख्य चौकात सायंकाळी नेहमीच वाहनांसकट पादचाऱ्यांचा चक्काजाम झालेला असतो. सिग्नल व वाहतुक पोलीस नसल्याने मनमानी पद्धतीने रिक्षांचालकांसह इतर वाहनचालकही आपली वाहने पुढे दामटवत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन चौकात प्रचंड वाहतुक कोंडी केली जाते. त्यात हॉर्नची पिकपिक करुन कानठल्या बसत असून या जंजाळातून पादचाऱ्यांना वाट काढणे मुश्किल होते. अनेकदा छोटे अपघात होऊन वादावादी होते.
रहिवाशी भागात जाणाऱ्या बस-रिक्षा, सेंटर गार्डनकडे जाणारी वाहने, रेल्वे स्थानकाकडे पायी जाण्याचा रस्ता याच चौकातून जात असल्याने या चौकात सिग्नलची नितांत गरज आहे. बस, रिक्षा, दुचाकी, चारचाकी यांची सतत वर्दळ असणाऱ्या या चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच विशेष करुन सायंकाळी याठिकाणी वाहतुक पोलीस नियुक्त करावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस