Breaking News
उद्धव ठाकरेंचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आवाहन
मुंबई : विधानसभेची निवडणूकीसाठी महाराष्ट्रात सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नेत्यांच्या सभा, मेळावे आणि आढावा बैठका सध्या सुरु आहेत. यातच शुक्रवारी महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटला आहे. यावेळी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, जो कोणी चेहरा असेल त्याला पाठिंबा दिला जाईल अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केली.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? यावर खलबतं सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधील पक्षाला आवाहन केलं आहे. शरद पवार आणि काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. मात्र, आपआपल्यामध्ये फक्त विधानसभेच्या जागांवरून मारामाऱ्या करू नका”, असं सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला. विधानसभेच्या जागावाटपांमध्ये एखादी जागा काँग्रेसकडे जास्त गेली तर राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने काम करायचं नाही असं करायचं नाही. तसेच एखादी जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेली तरीही सर्वांनी काम करायचं. आपली वज्रमूठ ही आपल्या कामामधून दिसली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
एकीकडे उद्धव ठाकरे यांना जरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी भूमिका घेतली असली तरी महाविकास आघाडीमधील इतर पक्षाकडून मात्र अद्यापही या संदर्भात सावध भूमिका घेतलेली पाहायला मिळतंय. प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत जरी सावध भूमिका घेतली असली तरी इतर नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरे हे प्रचाराचे प्रमुख असतील असे संकेत दिले. जो पहिले भाषण करतो तो प्रचार प्रमुख असतो असं म्हणत जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे संदर्भात भाष्य केलं. तर नसीम खान यांनींही तोच सूर ओढला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री नाही तर कुटुंबप्रमुख म्हणून राहिले आणि ते कुटुंबप्रमुख आहेत असं आपल्या भाषणात म्हटलं. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि इतर प्रमुख नेत्यांची सावध भूमिका असं सगळं चित्र आजच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात पाहायला मिळालं.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai