Breaking News
पनवेल ः रायगड जिल्ह्यात मलेरीयाचे प्रमाण घटले असले तरी डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत डेग्यूचे 446 रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यातील 112 रुग्ण हे ऑगस्ट महिन्यात गेल्या 21 दिवसांतील आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातही डेंग्यूने डोके वर काढले आहे.
जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात 4 हजार 464 जणांची डेग्यूसाठी तपासणी करण्यात आली. यात 446 जणांना डेग्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यात पनवेल महापालिका क्षेत्रातील 182 तर रायगड ग्रामीणमधील 264 रुग्णांचा समावेश आहे. यावरून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा प्रादुर्भाव सरू झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी डेंग्यूचे बहुतांश रुग्ण हे पनवेल महानगर क्षेत्रात आढळून येत असत. मात्र गेल्या वर्षभरात रायगडच्या ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात गेल्या 21 दिवसांत 112 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. यात पनवेल महापालिका क्षेत्रातील 66 तर रायगड ग्रामीणमधील 46 रुग्णांचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोप्रोली, खोपटे, अलिबाग तालुक्यातील वाघ्रण, कावाडे, सारळ तर पेण तालुक्यातील जिते गावात डेंग्यूचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. ही चिंतेची बाब असून मच्छरांची उत्पत्ती टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र यासाठी दरवर्षी जून महिन्यात केली जाणारी फवारणी यंदा करण्यात आलेली नसल्याची बाब समोर आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai