Breaking News
पनवेल : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला अस्वच्छतेच्या गर्तेत अडकले होते. नुकतेच पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सहयोगाने व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहिम राबवून रुग्णालय चकाचक करण्यात आले आहे. मात्र, तरीही भिंतीवर पिचकारी मारल्याने रंगरंगोटीचा मुद्दा समोर आला आहे. गुटखा खावून पिचकारी मारणाऱ्यांमुळे उपजिल्हा रुग्णालयाला मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे.
‘पनवेलच्या जनतेचा आवाज' या व्हॉट्सऍप समूहावर नवीन पनवेल येथील अनेक तरुणांनी चर्चा सुरु ठेवली होती. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना साद घालून ही अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य हटविण्याची मागणी केली होती. उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छते करिता कर्मचारी उपलब्ध नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले होते. शिवाय भूमिगत मजल्यावर शवविच्छेदन केंद्रात कुजत असलेले मृतदेहसुद्धा घाणीचे एक कारण बनले होते. सर्व बाबींचा आढावा घेत उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतेकरिता कांतीलाल कडू यांनी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांना साकडे घालून स्वच्छतेची मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यास सांगितले. चितळे यांनी तातडीने उपायुक्त वैभव विधाते, स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड आदींनी त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता मोहिम राबवून दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य हटविले. मात्र उपजिल्हा रुग्णलयात अंतररुग्ण, बाह्य रुग्ण, उपचाराकरिता दाखल केलेल्या रुग्णांना भेटायला येणार्या गुटखा बहाद्दरांनी रुग्णालयाच्या भिंतींवर पिचकार्या मारल्याने खूप घाण झाली आहे. भिंती धुवूनही परिस्थिती बदलत नाही. वारंवार तिकडे रंगरंगोटी करावी लागते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai