Breaking News
पनवेल : मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर असलेले लोखंडी संरक्षक कठडे तुटून पडल्याने गेल्या आठवडाभरात अनेक वाहनांना अपघात घडला. त्यात पावसाचे थैमान असल्याने अपघात आणि जखमींची संख्या वाढत होती. सामाजिक कार्यकर्त्यांंनी केलेल्या पाठपुराव्यानंतर एमएसआरडीसीने दुभाजकांवर लोखंडी संरक्षक कठडे उभारले आहेत.
पळस्पे फाट्यावरून मुंबई-पुण्याकडे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून पुढे जाताना डेरवली गावाजवळ काही वाहनांची धडक बसून संरक्षक कठडे तुटले होते. त्यात पावसाने थैमान घातल्याने रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने येथे तुटलेल्या संरक्षक कठड्याच्या मोकळ्या जागेतून आरपार जात होती. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. शोभेची झाडे लागवडीकरिता रुंद दुभाजक तयार केल्याने बऱ्यापैकी मोकळी जागा निर्माण झाली होती. त्यात पावसामुळे चिखलमय स्थिती झाली. अपघाताचे प्रमाण आपोआप वाढले आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक कोंडीत भर पडली.
यासंदर्भात धैर्यशील नागावडे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे दुभाजकावरील लांबच लांब संरक्षक कठडे तातडीने बांधण्याची मागणी केली. आठवडाभर त्यांनी पाठपुरावा करत होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनीही एमएसआरडीसीचे अभियांत्रिक विभागाचे अभियंता सचिन देवरे यांना अपघात टाळण्यासाठी संरक्षक कठडे तातडीने बसवण्याची विनंती केली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने दुभाजकांवर लोखंडी संरक्षक कठडे उभारले आहेत. यामुळे अपघातांना आळा बसणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai