Breaking News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची निवडणुकीत 82 उमेदवारांसह 20 बंडखोरांना रसद?
मुंबई ः 2019 साली राज्याच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत केलेला बंडाळीचा खेळ शिंदे यांनी या निवडणुकीत भाजपसोबत केल्याचे बोलले जात आहे. शिंदेंनी 82 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उभे केले असून 20 बंडखोरांना रसद पुरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे शिंदे यांनी भाजपवरच डाव उलटवून व्याजासह परतफेड केल्याने शिवसैनिकांत मोठा उत्साह आहे.
राज्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून नामांकन अर्ज भरण्याची तारीख मंगळवारी संपली आहे. यात महायुतीने 289 उमेदवार उभे केले असून त्यामध्ये भाजपने 152, शिंदे यांनी 82 तर अजित पवार यांनी 55 जागांवर आपले अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरेसेनेने 96 काँग्रेसने 102 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 87 उमेदवार उभे केले आहेत. यावेळी मनसेही 173, वंचित बहुजन आघाडी 163 व इतर घटक पक्षांचे उमेदवार रिंगणात आहे. आतापर्यंत 8000 उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले आहेत. खरी लढाई महाविकास आघाडी व महायुतीत असून मनसे व वंचित बहुजन आघाडी किती उमेदवार निवडणुन आणते किंवा उमेदवार पाडते यावर हा राजकीय खेळ अवंलबून आहे.
महायुतीत शिंदे यांनी 100 हून अधिक जागांची मागणी केली होती. परंतु, त्यांना 82 जागांवरच समाधान मानावे लागल्याने शिवसेनेच्या अनेक बंडखोरांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात आपले शड्डू ठोकले आहेत. शिंदे यांनी याशिवाय 20 हून अधिक अपक्षांना रसद पुरवल्याची चर्चा आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत हाच खेळ फडणवीस यांनी महाराष्ट्रात शिवसेनेसोबत केल्याची चर्चा त्यावेळी होती. शिवसेनेला दिलेल्या जागा कमी करुन त्याजागा त्यांच्या घटकपक्षांना दिल्या आणि घटकपक्षांना निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या तिकीटावर लढणे भाग पाडले. याशिवाय शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोर उभे करुन 20 जागा पाडल्याचे त्यावेळी बोलले जात होते. यावेळी शिंदे यांनी हाच खेळ भाजपसोबत खेळत 20 हून अधिक बंडखोरांसह अपक्षांना रसद पुरवून आपला खुंटा मजबुत केल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यावेळी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून बाळासाहेबांचे स्वप्न पुर्ण करतील अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेच्या एका नेत्याने आजची नवी मुंबईशी बोलताना दिली.
अनेक दिग्गज पक्षनेत्यांनी बंडखोरी केल्याने दोन्ही आघाडींची डोकेदुखी वाढली आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने तोपर्यंत किती बंडखोरांना नामांकन पत्र मागे घेण्यास महाविकास आघाडी व महायुती प्रवृत्त करतात यावर संभाव्य लढाईचा निर्णय लागणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai