प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 14, 2025
- 393
पहिल्या टप्प्यामध्ये 10 मॉल उभारणार; पंचवीस लाख लखपती दीदीचे उद्दिष्ट
मुंबई : महालक्ष्मी सरस हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात उमेद मॉल तयार करणार आहोत. त्याचबरोबर राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात 18 लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा, मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने 11 ते 23 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2025” चे उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महालक्ष्मी सरस हा गेली 21 वर्ष अविरत सुरू असलेला उपक्रम आहे. ‘उमेद’ अभियानाच्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे. उमेदच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. महिला बचतगटांची उत्पादने खूप चांगली असतात. पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारणार. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
बचत गटांमार्फत तयार केलेली वस्तू ही खाजगी कंपनीच्या मालापेक्षा अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असून ती अत्यंत माफक दरात उपलब्ध होतात. ‘उमेद’च्या माध्यमातून 60 लाखापेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत. या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दीदी‘ही योजना आणली आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना लखपती दीदी म्हटले जाते. आज महाराष्ट्रात 11 लाख पेक्षा जास्त लखपती दीदी आहेत. लवकरच 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा शासनाचा मानस आहे. आगामी कालावधीत एक कोटी महिला लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. ग्राम विकासमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बचत गटांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासन आग्रही आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित माल विक्रीचे हमखास ठिकाण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी मॉल उभारणार असल्याचे सांगितले.
- 11 ते 23 फेब्रुवारी दरम्यान सरस महालक्ष्मी
सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला 11 ते 23 फेब्रुवारी, या कालावधीत भेट देता येईल. या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावर तयार केलेले कपडे, वुडन क्राफ्ट, बंजारा आर्ट, वारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरी, लहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल आहे. या प्रदर्शनात एकूण 500 पेक्षा जास्त स्टॉल लागले आहेत, त्यापैकी 90 फुड स्टॉल आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai