पनवेल पालिकेचा 3 हजार 873 कोटींचा अर्थसंकल्प सादर
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2025
- 258
पालिकेचा पायाभूत सुविधांवर भर
पनवेल : पनवेल महापालिकेचे तीन हजार 873 कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढाल असलेला आणि 27 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प मंगळवारी आयुक्त चितळे यांनी सादर केला. महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे अंदाजपत्रकाची ही प्रत सादर केली. विशेष म्हणजे यंदा कुठलीही करवाढ न करता पायाभूत सुविधांवर भर देत गतीमान प्रशासनावर भर या अंदाजपत्रकात देण्यात आला आहे. देशातील एक पर्यावरण पूरक आणि हिरवेगार शहर ही पनवेलची ओळख यापुढेही कायम राहील अशापद्धतीचा संकल्प हा अर्थसंकल्प मांडताना आयुक्तांनी व्यक्त केला.
आर्थिक वर्ष 2025-26 साठी 3 हजार 873 कोटी 86 लाखांची जमा आणि 3 हजार 873 कोटी 59 लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक मंगळवारी महापालिकेत सादर करण्यात आले. महापालिकेची उत्पन्नासाठी संपूर्ण मदार मालमत्ता व इतर करांवर आहे. यातून 1 हजार 317 कोटी जमा होण्याचा अंदाज आहे. तर सर्वाधिक खर्च महसुली आणि भांडवली कामांवर केला जाणार आहे. हा खर्च 1 हजार 140 कोटी 59 लाख प्रस्तावित आहे. याशिवाय उत्पन्न वाढीवर भर देतानाच आरोग्य सुविधांवर भर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक संकल्पनांचा प्रभावी वापर, नव्या जलस्रोतांचा शोध घेणारा, स्वच्छ शहरासाठी लोकसहभागावर भर देणारा आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्यावर भर देणारा अर्थसंकल्प असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले.
पनवेल आणि आसपासच्या शहरातील उपनगरांमधील पिण्याचा पाण्याचा प्रश्न अनेकदा गंभीर रुप धारण करत असतो. या पार्श्वभूमीवर आयुक्त चितळे यांनी देहरंग धरणाची उंची आणखी 20 मीटरने वाढविण्याची घोषणा यावेळी केली. तसेच बाळगंगा प्रकल्पातील पाणी पनवेलकरांना मिळेल अशापद्धतीची आखणीही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावष उत्पन्न वाढीसाठी महापालिका वाहनतळाचे स्वतंत्र धोरणही राबवेल असेही चितळे यांनी स्पष्ट केले. महापालिका पाच ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.
बांधकाम विभाग
महापालिकेच्या स्वराज्य नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी 158 कोटी, महापौर निवासस्थान व नवीन प्रभाग कार्यालये बांधकामासाठी 38 कोटी, रस्त्यांचे कॉक्रिटीकरण आणि डांबरीकरण 437 कोटी, क्रीडांगणे 57 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहे. खारघरमध्ये नगरवाचन मंदिर आणि नाट्यगृह व वाचनालय बांधणीसाठी 14 कोटींच्या निधीची तरदूत केली आहे. शिवाय माता रमाबाई आंबेडकर भवन, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह यासाठी भरीव तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. गाढी नदीलगत पूर प्रतिबंधक बंधारा बांधणे आणि पंपिग स्टेशन उभारणीसाठी 17. 50 कोटीची तरतूद केली आहे. कळंबोली नोडमधील होल्डिंग पाँडमधील गाळ काढणे व इतर अनुषांगिक उपाय योजना करण्यासाठी 35 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ठळक वैशिट्ये
- पनवेलकरांना पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पालिकेने धोरण आखले असून उदंचन केंद्रातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्याचे शुद्धीकरण दोन ठिकाणी पालिका करणार आहे. कामोठे येथील 15 दश लक्ष लीटर क्षमतेच्या केंद्रावर पुनर्वापरायुक्त पाण्यासाठी 40 कोटींची तरतूद केली आहे.
- विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढीसाठी पालिकेने 83 कोटी रुपयांची उपाययोजना केली आहे. शैक्षणिक सोयीसुविधा नवीन शाळाबांधल्या जातील.
- पनवेलमध्ये दैनंदिन बाजारतळ उभारण्यासाठी 35 विविध भूखंड सिडकोने पालिकेला दिले आहेत. 80 कोटी रुपये यासाठी खर्चाची तरतूद
- पनवेलमध्ये 81 स्मशानभूमीत सुशोभिकरण करणे तसेच वायू प्रज्वलित शवदाहिनी, 25 टक्के सरपणाच्या लाकडांचा 100 टक्के परिणामांसाठी आधुनिक स्मशानभूमी
- खारघरमध्ये नाट्यगृह आणि नगरवाचन मंदिर, वाचनालय 14 कोटींची तरतूद
- बांधकामातून निघणारा राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पासाठी 7 कोटींची तरतूद
- खारघरमध्ये तारांगण प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने 18 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पनवेल महापालिकेने तारांगणासाठी 30 कोटी रुपयांचा बांधकाम खर्चाची तरतूद केली आहे. घनकचरा संकलन, वाहतूक व मनुष्यबळ इ कामासाठी 221 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
- हिरकणी माता व बाल संगोपन केंद्र -सर्व समावेशक 450 बेडचे हॉस्पिटल उभारणीसाठी 17.50 कोटींची तर कळंबोलीत 50 बेडचे हॉस्पिटल बांधण्याकरिता 10 कोटींची तरतूद
- अग्निशमन व सुरक्षा व्यवस्थापनासाठी 39 कोटी निधीची तरतूद
- भुयारी गटार व मलनिःसारण-रु. 178 कोटीची तरतूद
- नवीन शाळांच्या बांधकामासाठी 34 कोटी आणि महापालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेने बांधलेल्या शाळेची दुरुस्तीसाठी 10.72 कोटींचा निधी
- महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी यंदा 107 कोटींची तरतूद
येत्या चार वर्षांत उत्तम असा पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासाठी ठोस आखणी, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांसाठी भरीव आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पनवेल महापालिका हद्दीतील मुळ शहर आणि आसपासची उपनगरे रहाण्यासाठी संपन्न होतील अशा पद्धतीच्या प्रकल्पांचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. - आयुक्त मंगेश चितळे यांनी यावेळी दिली.
आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण
महापालिका येत्या काळात 450 खाटांचे माताबाल रुग्णालय सुरु करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यासंबंधीची निवीदा प्रक्रिया येत्या दहा दिवसात सुरु केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
‘वेस्ट टू एनज’
कचरा निर्मूलनासाठी पनवेल महापालिकेने एक पाऊल पुढे उचलले आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प पनवेल महापालिका आणि सिडको मंडळ हे संयुक्त भागीदारातून उभारत आहेत. हा प्रकल्प घोट (तळोजा) येथील सध्या सिडकोच्या सुरू असलेल्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये उभारण्यात येईल. ‘वेस्ट टू एनज’ असे या वीज निर्मिती प्रकल्पाचे नाव असून 650 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी पालिकेने 10 कोटी रुपयांची तरतूद सध्या अंदाजपत्रकात केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai