Breaking News
पनवेल : शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पनवेल महापालिका क्षेत्रातील 1 ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना 1 मार्च पासून जापनीज इन्सेफेलाइटिस लस अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळांमध्ये तसेच पनवेल क्षेत्रातील शाळाबाह्य परिसरात मोफत उपलब्ब्ध करुन देण्यात येत आहे. या लसीकरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने 28 फेब्रुवारी रोजी महापालिका मुख्यालयात आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्य बल अर्थात सिटी टास्क फोर्सच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
जापनीज इन्सेफेलाइटिस एक मेंदुज्वर आजाराचा प्रकार आहे. रायगड जिल्ह्यातही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सदर आजार डासांपासून पसरणाऱ्या विषाणुचा प्रकार आहे, जो लहान मुलांकरिता जीव घेणा ठरु शकतो. यामध्ये 30 टक्के रुग्ण दगावले जाऊ शकतात, तर 40 टक्के रुग्णांना कायमचे अपंगत्व येऊ शकते. या आजारावर आजतागायत कोणताही निश्चित अथवा ठोस उपाय उपलब्ध नसल्याने, तो आजार होऊ नये याकरिता शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या आजाराची लस मोफत उपलब्ध केली आहे. याबाबतची माहिती जास्तीत जास्त नागरिक, पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिध्दी माध्यमातून जनजागृती करावी, अशा सूचना उपायुक्त डॉ. विधाते यांनी यावेळी दिल्या. यावेळी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. गणेश नायर, डॉ. अरुणकुमार भगत, बालरोग तज्ञ डॉ. मोहिते, वैद्यकिय अधिकारी रेहाना मुजावर, महापालिका वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन 1 मार्च रोजी लोकनेते दि.बा.पाटील शाळेत संपन्न झाले.
जेई लस अंत्यत सुरक्षित असल्याकारणाने जागरुक पालकांनी आपल्या बालकांना सदर गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेने नियोजित केलेल्या ठिकाणी आपल्या बालकाचे न चुकता लसीकरण करुन घ्यावे. या मेंदुज्वराच्या, जेई आजारांपासुन सुरक्षित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. -डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल महापालिका.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai