Breaking News
शेकडो संसार रस्त्यावर ; विकासकांवर कारवाईची मागणी
खारघर : खासगी विकासकाने सिडकोची कोणतीही परवानगी न घेता खारघर सेक्टर-5 मधील मित्र हॉस्पिटल आणि हेदोरवाडी पाड्यालगत बेकायदा उभारलेल्या अनधिकृत इमारतीवर सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने कारवाई केली. मात्र, या कारवाईमुळे आयुष्याची पुंजी खर्च करुन घरे घेणारे आज बेघर झाले असून त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकांमुळे ही फसवणुक झाली त्याच्यावर कारवाई करुन घरांसाठी गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळावी, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे.
खारघर ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना एका बांधकाम व्यावसायिकाने राजकीय व्यक्तीच्या सहकार्याने अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. याविषयी सिडको अधिकाऱ्यांना माहिती प्राप्त होताच सदर बांधकामावर थातूर-मातुर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अपूर्ण अवस्थेत असलेले बेकायदा इमारतीचे बांधकाम जैसे थे स्थितीत होते. मात्र, सिडको प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने सदर खाजगी बांधकाम व्यावसायिकाने पोटमाळ्यांसह 6 मजली मोठी अनधिकृत इमारत उभारली. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर इमारतीत दुकान गाळे, वन रुम किचन आणि वन बीएचके आकाराची 110 घरे आहेत. त्यातील काही घरांची विक्री झाली होती तर काहींना घर भाड्याने दिले होते. सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिकारी 2 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता जेसीबी, पोकलन आणि पोलीस पथकासह घटनास्थही दाखल झाले. इमारतीत वास्तव्य करणाऱ्या कुटुंबियांना बाहेर काढून सकाळी सदर बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे सदर इमारतीत घरे विकत घेवून आणि भाड्याने वास्तव्य करणाऱ्या महिला, लहान मुले-मुली आणि पुरुष घरातील सामान घेवून रस्त्यावर उभे होते. बेकायदा इमारतीवर तोडक कारवाईवेळी सिडको अनधिकृत बांधकाम मुख्य नियंत्रक तथा अपर जिल्हाधिकारी शिवराज पाटील यांच्यासह इतर सिडको अधिकारी उपस्थित होते. इमारतीवर तोडक कारवाई करताना धुलिमुळे काम करणारे कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास होवू नये म्हणून पाण्याची फवारणी केली जात होती.
खारघर सेक्टर-5 मधील सिडकोच्या राखीव भूखंडावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. खारघर परिसरात असलेल्या अन्य अनधिकृत इमारतींवर योग्य वेळी कारवाई केली जाणार आहे. - सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी- सिडको.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai