Breaking News
नवी मुंबई ः पालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून पंधरवडाभर ‘जागर’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये ‘प्रिय भिमास’ या कार्यक्रमाव्दारे कविवर्य अरुण म्हात्रे यांनी गंधार जाधव व गाथा आयगोळे या गायकांच्या साथीने शब्द स्वरांजली अर्पण करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
बाबासाहेबांच्या कविता आणि गाणे म्हणजे प्रकाशाचे गाणे असून ते अंधारलेल्या आयुष्याला उजेड दाखविते अशा शब्दात या काव्य-गीतांची महती सांगत नामांकित कवी अरुण म्हात्रे यांनी ‘जागर म्हणजे केवळ गुणगान नाही तर प्रत्यक्षात अंमलात आणायचा निश्चय आहे’ असे म्हणत गीत-काव्यात्म जागर केला. नामांतराच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर बाबासाहेब अधिक कळायला सुरुवात झाली असे सांगत त्यावेळच्या तुरुंगातील आठवणी व चळवळीतील गाणी श्री. अरुण म्हात्रे यांनी सादर केली. ‘जागर’ कवितेने कार्यक्रमाची सुरुवात करीत जागरचे विविध अर्थ त्यांनी उलगडून सांगितले. परिवर्तनाच्या चळवळीत आपला आवाज जपला पाहिले असे सांगताना ‘पाहिला भीम आम्ही लढणाऱ्यांमधी’ ही कविता त्यांनी समरसून सादर केली. कविवर्य कुसुमाग्रज, सुरेश भट, वामनदादा कर्डक, नामदेव ढसाळ, अशोक नायगावकर, संभाजी भगत यांच्यासह स्वत:च्याही कविता सादर करीत अरुण म्हात्रे यांनी वातावरण भारुन टाकले. नामदेव ढसाळ यांच्या विविधांगी कविता सादर करीत नामदेव ढसाळांच्या रक्तातल्या डिएनएमध्ये बाबासाहेब होते असे सांगताना त्यांनी ‘बाबासाहेबांवरील निस्सीम प्रेम म्हणजे नामदेव ढसाळ यांची कविता’ असे भाष्य केले. वामनदादा कर्डक हे जनसामान्यांना कळेल अशा भाषेत लिहणारे लोककवी होते असे सांगताना ‘उध्दरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे वामनदादांचे गीत रसिकांना भावले.
‘भीमा भिमराया’ हे अरुण म्हात्रे लिखीत गीत भावपूर्ण शैलीत सादर करीत रसिकांची दाद मिळविणाऱ्या गायक गंधार जाधव यांनी ‘तुझ्यासाठी तो झिजला त्याचं आटलं रगात, तेज भिमाच्या बुध्दिचं जरा भिनू दे अंगात’ हे आपल्या आजोबांचे गीत गात बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. गायिका गाथा जाधव यांनी सादर केलेल्या ‘माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं..’ गाण्याने रसिकांना भुरळ घातली. बाटमध्ये सादर केले जाणारे अप्रतिम ‘संविधान गीत’ सादर झाल्यानंतर अरुण म्हात्रे यांनी ‘समाजमुक्तीचे गाणे बाबासाहेबांनी लिहिले’ अशा शब्दात संविधानाचा गौरव केला. ‘कबीरा कहे ये जग अंधा’ या गीतातून बाबासाहेबांना गुरुस्थानी असलेल्या कबीराचे तत्वज्ञान सांगून कविवर्य सुरेश भट यांच्या ‘भिमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना’ या कवितेने कार्यक्रमाची सांगता करतांना सर्व श्रोत्यांनी उभे राहून बाबासाहेबांना मानवंदना दिली. श्रोत्यांची संभाव्य गद लक्षात घेऊन स्मारकाबाहेर मोठी स्क्रीन लावून लाईव्ह प्रक्षेपण बघण्याची सुविधा करून देण्यात आली होती. त्याठिकाणीही रसिकांची मोठ्या प्रमाणावर गद होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai