Breaking News
नवी मुंबई ः क्षेत्रीय कार्यालयांसाठी मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसांचा कृती आराखडा जाहीर केलेला असून या अंतर्गत सात कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिकेने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडी घेतली असून पालिकेचे संकेतस्थळ अधिक अद्ययावत व वापरण्यास सुलभ करण्यात आलेले आहे. स्वतंत्र ॲपही कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तसेच तब्बल 50227 मुदतबाह्य नस्ती नष्ट करण्यात आल्या आहेत.
पालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा ऑनलाईन करण्यावर भर देण्यात आला असून नागरिकांना विनासायास सुलभतेने सेवा उपलब्धतेसाठी पावले उचलण्यात आलेली आहेत. जनतेच्या तक्रारींचे निवारण जलदगतीने होऊन त्यांना समस्येचे निराकरण झाले असल्याचे सूचित करणारी तक्रार निवारण प्रणाली अद्ययावत करण्यात आलेली असून त्यामुळे नागरिकांशी संवाद वाढला आहे. यामध्ये कार्यालयीन स्वच्छतेवर भर देतानाच कार्यालयांमध्ये स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सर्व सुविधांसह सुसज्ज प्रतिक्षा कक्ष व त्याठिकाणी वाचनासाठी पुस्तकांची सुविधा असे विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.
कार्यालयीन स्वच्छतेवर भर देताना कागदपत्रे व नस्तींचे निंदणीकरण, तपासणी, नष्टीकरण व निर्लेखनाची प्रक्रिया सर्वच विभागांमध्ये व विभाग कार्यालयांमध्ये प्राधान्याने हाती घेण्यात आलेली असून सर्व अभिलेखांचे वगकरण करून नियमानुसार ‘अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग’ याप्रमाणे विहित कालावधीकरिता अभिलेख जतन करण्यासाठी अभिलेख कक्षाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अभिलेखांच्या निंदणीकरणानंतर आवश्यक नसलेला अभिलेख नियमांचे रितसर पालन करून नष्ट करण्यात आलेला असून मुदतबाह्य अभिलेखही नष्ट करण्यात येत आहे. यामध्ये तब्बल 50 हजार 227 मुदतबाह्य नस्ती (फाईल्स) नष्ट करण्यात येत असून त्यामध्ये ब वर्गातील 46, क 1 वर्गातील 36808, क वर्गातील 4066 आणि ड वर्गातील 9307 नस्तींचा समावेश आहे. अशा एकूण 50227 मुदतबाह्य नस्ती ह्या नष्ट करण्यात येत असल्याची माहिती अभिलेख कक्ष विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांनी दिली आहे. यामध्ये बेलापूर अभिलेख कक्षातील क 1 वर्गातील 9955 नस्ती तसेच क वर्गातील 2749 नस्ती त्याचप्रमाणे ऐरोली अभिलेख कक्षातील ब वर्गातील 46, क 1 वर्गातील 26853 आणि क वर्गातील 1317 नस्तींचा समावेश आहे. यासोबतच 9307 ड वर्गातील नस्तीही नष्ट करण्यात येत आहेत. अशाप्रकारे एकूण 50227 नस्ती नष्ट करण्यात येत आहेत.
अशा 50227 नस्तींमध्ये स्थानिक संस्था कर /उपकर विभागाच्या सर्वाधिक 23070 नस्तींचा समावेश आहे तसेच मालमत्ताकर विभागाच्या 647 नस्तींचा समावेश असल्याची माहिती या विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांनी दिलेली आहे. कृती आराखड्यात जोमाने केलेली अभिलेख विषयक निंदणीकरण, नष्टीकरण, निर्लेखन व अभिलेख कक्षात जतन यावाबतची प्रक्रिया यापुढील काळात सर्व विभागांनी नियमित सुरू ठेवून त्याकरिता कालावधी निश्चित करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश आयुक्तांनी सर्वच विभागांना दिले आहेत. 100 दिवसांच्या कृती आराखड्यातील सात कलमांतर्गत नमूद सर्वच बाबींच्या कार्यवाहीत नवी मुंबई महापालिकेने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवातीपासूनच आघाडी घेतली असून महापालिकेची आधीपासूनच स्वच्छ असणारी कार्यालये आता अधिकच सुंदर दिसू लागली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून प्राप्त होत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai