महाविकास आघाडीला भगदाड!
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 18, 2025
- 503
22 एप्रिलला 15 पदाधिकारी शिंदेसेनेत करणार पक्षप्रवेश
नवी मुंबई ः मुंबईत ठाकरे सेनेला भगदाड पाडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आता नवी मुंबईकडे मोर्चा वळविला आहे. नवी मुंबईतून ठाकरे सेनेचे 8 माजी नगरसेवक, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे 7 असे एकुण 15 स्थानिक पदाधिकारी शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईत महाविकास आघाडीला भगदाड पाडून भाजपापुढे मोठे आव्हान उभे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेचे 57 उमेदवार निवडून आल्याने ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह गळून पडला आहे. शिंदे सेनेकडून पक्ष वाढवण्यासाठी म्हणावा तसा प्रयत्न उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याकडून मिळत नसल्याने अनेक पदाधिकाऱ्यांच्या नाराजीत भर पडली आहे. आमच्या मातोश्रीतील विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप अनेक पदाधिकारी खाजगीत करत आहेत. त्यामुळे शिवसेनेतील नाराजी वाढत जात असून या पक्षात कोणतेच राजकीय भविष्य नसल्याची चिंता कार्यकर्त्यांना सतावत आहे. या गोष्टीचा फायदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा सपाटा लावला आहे. दिवाळीच्या जवळपास महाराष्ट्रातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचे निश्चित केल्याचे कळते. त्यामुळे ठाकरे सेनेच्या वाटेला कमी जागा येतील आणि आपली राजकीय कुचंबणा होईल या हेतुने अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत जाण्याचा मार्ग चोखाळला आहे. त्यातच काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचेही पदाधिकारी भाजपापेक्षा शिंदे यांच्या पक्षात जाणे पसंत करत असल्याने शिंदे सेनेमध्ये पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच मुंबईतील घाडी कुटुंबाने ठाकरे सेनेचा त्याग करुन शिंदे सेनेत प्रवेश केल्याने त्याचा मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे.
मुंबई महापालिकेनंतर नवी मुंबई महापालिका ही राज्यात श्रीमंत महापालिका म्हणून गणली जाते. नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या उद्देशाने शिंदे यांनी रणनिती आखली असून अनेक पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला आहे. त्यामध्ये काँग्रेसचे रमाकांत म्हात्रेंसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. 22 एप्रिल रोजी शिंदे यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का देण्याची योजना आखली असून त्यामध्ये नवी मुंबईतील 15 माजी नगरसेवक शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार आहेत. यामध्ये ठाकरे सेनेचे 8 तर काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 7 नगरसेवक शिंदेसेनेत जाणार आहेत. यामुळे शिंदे यांनी भाजपापुढे मोठे आव्हान नवी मुंबईत उभे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे 22 एप्रिलला होणाऱ्या पक्षप्रवेशाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
- सेना मनसे एकत्र?
मुंबई महापालिकेच्या संभाव्य निवडणुकीत शिंदेसेना व मनसे एकत्र निवडणुक लढणार अशी सध्या चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकतेच राज ठाकरे यांची भेट घेऊन अप्रत्यक्षपणे सेना-मनसे एकत्र येणार असल्याचा संदेश राज्याला दिला आहे. मनसेकडे कार्यकर्त्यांची प्रचंड फळी असून शिंदे सेनेकडे नेत्यांची प्रचंड रेलचेल असल्याने शिंदे-मनसे मुंबई महापालिका निवडणुकीत चमत्कार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांच्या या खेळीने भाजपला बॅकफुटवर ढकलल्याची चर्चा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai