Breaking News
सांडपाणी सोडणाऱ्यांचे होणार स्क्रीनिंग; स्मॉल चेन ऑफ बंधारे बांधणार
पनवेल : तळोजा एमआयडीसी आणि परिसरातील गावांना जोडणाऱ्या कासाडी नदीच्या संवर्धनासाठी ‘कासाडी नदी पुनरूज्जीवन प्रकल्प’ राबवण्यात येत आहे. नदीच्या संवर्धनासाठी योग्य ती उपाययोजना करण्याकरिता नियोजनाची जबाबदारी पनवेल पालिकेवर देण्यात आली आहे. या अनुषंगाने लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पाहणी पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी केली. यावेळी संबंधित आस्थापनांना विविध निर्देश दिले.
कासाडी नदी संवर्धनासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. यासाठी विविध कंपन्यांकडून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर देखरेख करून त्याच स्क्रीनिंग करण्याविषयीचे निर्देश संबधित आस्थापनांना पनवेल महापालिकेने दिले आहेत. गणेश घाट, तोंडरे येथील नदीपात्रात कंपनी, टँकरने केमिकलयुक्त पाणी, सांडपाणी बेकायदा सोडले जाते. अशा कंपन्या, टँकरवर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळास सूचित करण्यात आले आहे. यासाठी सीसीटीव्ही लावण्याचे शेटे यांनी एमपीसीबीला निर्देश दिले. तसेच गणेश घाट, तोंडरे येथील नदीपात्रात ‘स्मॉल चेन ऑफ बंधारे’ बांधण्याचे नियोजन करणे, काप्रेचार्य मंदिर, नावडे येथे भरतीच्या वेळी नदीचे पाणी गावामध्ये घुसू नये यासाठी गॅबियन वॉल बांधणेबाबत नियोजन करण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांनी निर्देश दिले. यावेळी उपायुक्त स्वरुप खारगे, शहर अभियंता संजय कटेकर, उप अभियंता विलास चव्हाण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ. विक्रांत भालेराव, जलसंपदा उप अभियंता अमित पारळे, सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता मेंगाळ, एमआयडीसीचे दिलीप बोबडे-पाटील, माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे उपस्थित होते.
कासाडी नदीचा मूळ प्रवाह उन्हाळ्यात प्रवाहित राहण्यासाठी नदीमधील अडथळे काढणे तसेच नदीतील केमिकलयुक्त पाणी सीईटीपीला ट्रान्सफर करून त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करणे, एमआयडीसी हद्दीतील रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात येणाऱ्या टँकरवर कारवाई करण्याबाबत एमआयडीसी आस्थापनांना अतिरिक्त आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
कासाडी नदी संवर्धनाबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करुन संबंधितांनी उचित कार्यवाही विहित मुदतीत करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्क्त गणेश शेटे यांनी दिले. यावेळी पर्यावरण विभागप्रमुख मनोज चव्हाण, टीआयए सतीश शेट्टी, सुनील पडलानी, प्रभाग अधीक्षक जितेंद्र मढवी, सहाय्यक अभियंता औदुंबर अलाट, सहाय्यक अभियंता एच. एन. सरग, सहाय्यक अभियंता निवृत्ती चंदेवाड उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai