Breaking News
टोळी 36 तासांत अटकेत ; 30 लाख 48 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई : जुईनगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी गेलेल्या तरुणाजवळची पोलीस असल्याची बतावणी करुन त्याच्याजवळील 31 लाखांहून अधिकची रोख रक्कम जबरदस्तीने लुटून चोरांनी पोबारा केला होता. सानपाडा पोलिसांनी या टोळीला अवघ्या 36 तासांत अटक केली आहे. केवळ 1 पोलीस अधिकारी व 4 अमलदार यांच्या तपास पथकाने बेंगळुरु (कर्नाटक) येथून या टोळीतील आठ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुन 30 लाखांहून अधिक रक्कम आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गत 31 मे रोजी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास मोहम्मद रमीस अब्दुल हमीद ईदवलथ (25) हा तरुण एसबीआय बँकेच्या जुईनगर शाखेतील एटीएममध्ये 31 लाख 73 हजार रुपयांची रोख रक्कम डिपॉझिट करण्यासाठी गेला होता. यावेळी पोलीस असल्याची बतावणी करत सदर एटीएममध्ये घुसलेल्या टोळीने मोहम्मद रमीस याला मारुती अर्टिगा कारमध्ये जबरदस्तीने बसवले. या टोळीने त्याला मारहाण व दमदाटी करत त्याच्याजवळ असलेली 31 लाख 73 हजाराची रोख रक्कम लुटून त्याला पामबीच मार्गावर सोडून पळ काढला होता. याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल मुंडे पोलीस हवालदार सुनिल चव्हाण, श्रीकांत नार्वेकर, संतोष बडे, संदिप पवार पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोसले व गोरक्षनाथ गायकवाड आदींचे पथक तयार करण्यात आले. या पोलीस तपास पथकाने तांत्रिक तपासाद्वारे या गुह्यातील कारचा मागोवा घेत कार चालकाला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा करणाऱ्या टोळीने केरळ मधील सायबर पोलीस असल्याचे सांगून त्याची कार घेतल्याचे व पुन्हा सानपाडा हायवे येथे कार सोडून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सानपाडा हायवे ब्रिजजवळच्या लॉजेसची तपासणी केली. आरोपी हे बेंगळुरु, कर्नाटक येथे पळून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांचे पथक बंगळुरु येथे रवाना करण्यात आले. त्यानंतर तपास पथकाने त्या भागातील जवळपास 500 लॉजेसची तपासणी करुन बेंगळुरु येथील उप्परस्पेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठ आरोपींचा शोध घेऊन 36 तासांत त्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडुन रोख रक्कम, मोबाईल फोन्स, मारुती अर्टिगा कार आणि बँक खात्यांमधील ठेव रक्कम असा एकुण 30 लाख 48 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने या आरोपींना 7 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक आरोपींमध्ये थानसीर हमसा (26), निजास मोईन (27),जॉनसन सन्नी (45), अन्वर माहीन बाशा (25), फासील कासीम (30), मोहम्मद साबीत अश्रफ (25), फसील कासीम (28), फासील अब्दुल रेहमान (31) या आठ जणांचा समावेश असुन हे आरोपी तामिळनाडू व केरळ मधील आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai