मनसे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

नवी मुंबई : एप्रिल महिन्यात होणार्‍या नवी मंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच सर्वपक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. या पालिका निवडणुकीच्या रिंगणात मनसेही उतरणार असल्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. सानपाडा येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्र महोत्सव प्रसंगी ते बोलत होते. तसेच 9 मार्चला मनसेचा 14 वा वर्धापनदिन सोहळा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे पार पडणार आहे. 

मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी जनविकास प्रबोधिनी या संस्थेमार्फत सानपाडा येथे पश्चिम महाराष्टल महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यास राज ठाकरे यांनी शनिवारी उपस्थिती दर्शवली होती. तोंडावर आलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे उमेदवार उतरवणार असल्यावर राज ठाकरे यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निवडणूक काळात शहरात आपली सभा लागल्यास राजकीय भाष्य करू, असे वक्तव्य त्यांनी सानपाडा येथे केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबईतही मनसेला गळती लागली होती. परंतु शहर अध्यक्ष गजानन काळे व पक्षाच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या हालचालीमुळे ही गळती थांबली होती. अशातच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीच महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात सभा होणार असल्याचे संकेत दिल्याने मनसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा पहिल्यांदाच मुंबई बाहेर होणार आहे. नवी मुंबईत 9 मार्चला मनसेचा 14 वा वर्धापनदिन सोहळा होणार आहे. विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी इथे हा वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे.