सानपाडातील अनधिकृत झोपड्या हटवा

स्थानिक नगरसेविकांचे पालिकेला निवेदन 

नवी मुंबई : सानपाडा परिसरात असणार्‍या अनधिकृत झोपड्यामधून गैरकृत्य चालू असल्याने या झोपड्या हटविण्यासाठी गेली तीन वर्ष स्थानिक नगरसेविका पालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने 24 फेब्रुवारीला पुन्हा स्मरण पत्र देऊन या झोपड्या हटविण्याचे निवेदन पालिका, विभाग कार्यालये तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. 

सानपाडा सेक्टर 15, 16ए, 17, 18, 19, 20 या ठिकाणी अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहतात. तसेच सदरच्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरात सुशिक्षित नागरी वसाहत आहे. झोपड्यांमधील नागरिकांमुळे विविध अस्वच्छता व अशांतता यापासून होणार्‍या त्रासाने तेथील नागरीक व्यथित झाले आहेत. तसेच सदरच्या झोपड्यांमध्ये गैर प्रकार खूप चालतात असे निदर्शनास आले आहे. जसे नशा करणारे काही समाज कंटकांचा ह्या परिसरात जास्त वावर आहे. बहुतेक ह्या झोपडपट्टीतून गांजा यासारख्या नशेली पदार्थांची विक्री होते असे सुद्धा निदर्शनास आलेले आहे. या झोपड्या हटविण्यासाठी स्थानिक नगरसेविका वैजयंती भगत आणि रुपाली भगत यांनी मागील तीन वर्षांपासून पालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरु ठेवलेला होता. परंतु महानगर पालिकेच्या स्तरावर कोणत्याही प्रकारची हालचाल सुरु झालेली दिसत नसल्या कारणाने 24 फेबु्रवारी 2020 रोजी स्मरण पत्र म्हणून पत्रव्यवहार केला आहे. येथे होणारी अस्वच्छता, अशांतता व होणारे गैरप्रकार या पासून येथील शहरी नागरिकांना दिलासा द्यावा. अश्या प्रकारच्या मागण्या ह्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. पालिका आयुक्तांप्रमाणेच महापौर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग व विभाग अधिकारी, तुर्भे विभाग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक-सानपाडा पोलीस ठाणे यांनांही निवेदन देण्यात आले आहे. सदर झोपडयांना नमुंमपा प्रशासनाच्या वतीने नगरविकास विभागाने अधिकृत परवानगी दिली नसल्याचे आयुक्तंनी मान्य करीत ह्या अनाधिकृत झोपड्या त्वरित हटविण्याचे आश्वासन दिले आहे.