बोगस ओसी-सीसीच्या आधारे बेकायदा इमारतींमधील सदनिकांची विक्री
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 08, 2025
- 228
नवी मुंबई : बोगस बांधकाम परवानगी तसेच भोगवटा प्रमाणपत्र तयार करून ग्राहकांना गंडा घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतही उघडकीस आला आहे. रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोठीवली गाव परिसरात पालिकेच्या नगररचना विभागाचे बनावट प्रमाणपत्र बनवून बेकायदा इमारतींमधील सदनिकांची विक्री सुरू असल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. महापालिकेने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. बेसुमार पद्धतीने सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत.
दिवा, कल्याण डोंबिवली पाठोपाठ आता नवी मुंबईतही अनधिकृत बांधकाम आणि बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांची विक्रि करुन गरजूंची फसवणुक सुरु झाली आहे. नवी मुंबईतील काही ठराविक गावांलगत असलेल्या सिडको तसेच खासगी मालकीच्या मोकळ्या जागा बळकावून सर्रास बेकायदा बांधकामे करणारी एक मोठी टोळी गेल्या काही वर्षात सक्रिय आहे. ऐरोली, दिघा, घणसोली, कोपरखैरणे यापरिसरात बेकायदा इमले मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहेत. विद्यमान महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिव्यातील प्रकरणानंतर तर सर्व विभाग अधिकाऱ्यांना अशी बांधकामे रोखण्याचे सक्त आदेश दिले. त्यानंतरही ऐरोली, दिघा, घणसोली विभाग कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अशी बांधकामे सुरूच आहेत. गोठीवली परिसरातील अशाच एका प्रकरणात महापालिकेच्या नगररचना विभागाची बनावट प्रमाणपत्र सादर करुन ग्राहकांची फसवणूक केली गेल्याचे उघडकीस आले आहे. नगररचना विभागाची बांधकाम परवानगी तसेच काही इमारतींचे बोगस भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन इमारतीमधील सदनिकांची विक्रि सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी महापालिकेच्या नगररचना विभागाने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशामुळे गेल्या काही महिन्यांपासून कळवा, विटावा, दिवा, मुंब्रा या भागातील बेकायदा बांधकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे कळवा-विटाव्यातील भूमाफिया आणि बेकायदा बांधकामे करण्यात पारंगत असलेल्या टोळीने आपला मोर्चा नवी मुंबईच्या दिशेने वळविला आहे. दिघा, ऐरोली, गोठीवली, तळवली या भागात यापूर्वीच यापैकी काही बांधकाम माफिया सक्रिय होते. स्थानिकांना हाताशी धरून हजारो बेकायदा घरांची उभारणी आजवर करण्यात आली आहे. असे असताना आता तर महापालिकेची बोगस प्रमाणपत्र तयार करुन घरांची विक्री सुरू झाल्याने नवी मुंबईतही भविष्यात या बांधकामांचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेचा अतिक्रमण नियंत्रण विभागाचे अपयश उघडे पडू लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai