नाल्यात हानीकारक रयासन सोडणारे टँकर जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 15, 2025
- 191
नवी मुंबई ः दिघा विभागामध्ये ग्रीन वर्ल्ड सोसायटी आणि रामनगर परिसरात केमिकलचा उग्र वास येत असल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. त्या भागात अथवा नाल्यामध्ये अज्ञात व्यक्ती उग्र रसायन सोडत असल्याचा संशय असल्याने त्याआधारे शोध घेण्यात येत होता. दरम्यान पालिका, प्रदुषण मंडळाने पोलीसांच्या मदतीने पाळत ठेवण्यात आली, तसेच रात्रीच्या वेळी गस्तही सुरु होती. यावेळी दिघा स्टेशनसमोर मुकंद कंपनी गेटजवळ उभ्या असलेल्या संशयित टँकरच्या तपासणीमध्ये उग्र दुर्गंधीचे हानीकारक रसायन आढळून आले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
दिघा विभागामध्ये 07 ऑगस्टपासून ग्रीन वर्ल्ड सोसायटी आणि रामनगर परिसरात केमिकलचा उग्र वास येत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या भागात अथवा नाल्यामध्ये अज्ञात व्यक्ती उग्र रसायन सोडत असल्याचा संशय असल्याने पोलीस यंत्रणा, ऐरोली अग्निशमन दल, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाला कळविण्यात आले होते. त्यानुसार सदर रसायन कोठे सोडण्यात येत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यावेळी नवी मुंबई पालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत ग्रीन वर्ल्ड सोसायटी समोरील नाल्यातील पाण्याचे सॅम्पल तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतरही दिघा विभागातील तसेच पर्यावरण विभागातील अधिकारी/कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अडकर आणि देशमुख तसेच नवी मुंबई पालिका पर्यावरण विभागातील कनिष्ठ अभियंता अजिंक्य पाटील व दिघा विभाग कार्यालयामार्फत पहाटेपर्यंत संयुक्त तपासणी दौरा करण्यात आला.
या दौऱ्यामध्ये ग्रीन वर्ल्ड सोसायटीमधील पदाधिकारी व नागरिक यांच्याकडेही चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये ऐरोली मधील नेवा गार्डन सोसायटीच्या जवळ असलेल्या नाल्यामध्ये रात्री टँकरद्वारे केमिकल सोडण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमार्फत पाळत ठेवण्यात आली, तसेच रात्रीच्या वेळी गस्तही सुरु होती. या गस्तीमध्ये 11 ऑगस्ट रोजी रात्री साधारणत: 1.00 वाजता. दिघा स्टेशन समोर मुकंद कंपनी गेटजवळ उभ्या असलेल्या संशयित टँकरच्या तपासणीमध्ये त्या टँकरमध्ये उग्र दुर्गंधीचे रसायन असल्याचे आढळून आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन आडकर, सचिन देसाई आणि देशमुख यांनी लिटमस पेपरद्वारे ते रसायन तपासले असता सदर रसायन हानीकारक असल्याचे आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि नवी मुंबई महापालिकेचे दिघा विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त नैनेश बदले व पर्यावरण विभागातील कनिष्ठ अभियंता अजिंक्य पाटील या सर्वांनी पोलीसांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळी उभ्या असलेल्या टँकर मधील रसायनाचे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि नमुंमपा पर्यावरण विभाग यांच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai