Breaking News
पनवेल ः पनवेल पालिकेच्या वाढीव मालमत्ता करावरुन महाविकास आघाडीने बुधवारी पालिकेवर धडक दिली. पालिकेने मूळ मालमत्ता करात सवलत न देता केवळ करावरील 90 टक्के शास्ती माफी केली आहे, ही दिशाभूल असून मुळ करात सवलत देण्याची मागणी मविआने केली. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे आणि पावसाळ्यात पनवेल व खारघरकरांवर ओढवणारे पाणी संकट तातडीने दूर करावे, या मागण्या यावेळी प्रकर्षाने मांडण्यात आल्या. शहरी भागातील नागरिकांनी मोर्चाकडे पाठ फिरवल्याचे पहावयास मिळाले. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात मनसे देखील उतरली होती.
पनवेल महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांवर लादलेला मालमत्ता कर तातडीने कमी करावा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे आणि पावसाळ्यात पनवेल व खारघरकरांवर ओढवणारे पाणी संकट तातडीने दूर करावे, या तीन प्रमुख मागण्यांसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठीदेखील वेळ दिला नाही. महायुती सरकारने टाळाटाळीची भूमिका कायम ठेवली. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखेर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखण्याचा इशारा बुधवारी पनवेल येथे महाविकास आघाडीतील नेत्यांनी दिला. बुधवारी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयावर असंख्य कार्यकर्त्यांसह मोर्चा काढून महाविकास आघाडीने पनवेलमध्ये शक्तीप्रदर्शन केले. या मोर्चात भारतीय शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस पक्ष तसेच इतर घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ऑक्टोबर 2016 साली स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेने करदात्यांना 2021 साली मालमत्ता कराची देयके विलंबाने पाठवली, ही महापालिका प्रशासनाची चूक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
पहिल्या पाच वर्षांचा कर पूर्णपणे माफ करण्याची मागणी असताना, केवळ शास्तीमध्ये 90 टक्के सवलत देऊन जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून करण्यात आला. पनवेल, उरण आणि नवी मुंबईचे आमदार भाजपचे असतानाही, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले नाही, याबाबतही नेत्यांनी संताप व्यक्त केला. खारघर सारख्या नियोजित उपनगरातही पावसाळ्यात रहिवाशांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते, हे वास्तव बदलून 24 तास मुबलक पाणीपुरवठा कधी होणार, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. या मोर्चाचे नेतृत्व शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, अतुल म्हात्रे, शिवसेना (उद्धव ठाकरे) चे संजोग वाघेरे, बबन पाटील, शिरीष घरत, मनसेचे योगेश चिले, काँग्रेसचे सुदाम पाटील, श्रुती म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)च्या भावना घाणेकर, शिवसेनेचे दीपक निकम, शेकापचे प्रकाश म्हात्रे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले.सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज/चौकातून निघालेला मोर्चा दुपारी बारा वाजता महापालिका मुख्यालयासमोर दाखल झाला. नेत्यांच्या भाषणासाठी महापालिकेकडून मोहल््याकडे जाणारा मार्ग रोखून ट्रक आडवा उभा करण्यात आला आणि त्यावरून नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
दिशादर्शक फलकांना फासले काळे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अद्याप लोकेनेते दि.बा.पाटील यांचे नाव न दिल्याने बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेल महापालिकेने उभारलेल्या दिशादर्शक व नाम फलकावर काळा रंग उडवून लवकर दि.बा.पाटील यांचे नाव देण्याविषयी आक्रमक भूमिका घेतली. महाविकास आघाडीतील विविध राजकीय घटक पक्षांनी पनवेलमध्ये महापालिकेविरोधात मोर्चा सुरू असताना मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भुमिका घेऊन हे आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा मनसेने व महाविकास आघाडीने दिला आहे. पनवेल महानगरपालिकेने स्वखर्चाने नवी मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या महामार्गांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गाचे दिशादर्शक उभारले आहेत. या फलकांवर दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच लिहीलेले गेले पाहीजे अशी पनवेल व उऱण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. सध्या याविषयीचा अंतिम निर्णय केंद्र सरकार जाहीर करेल असेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने दि.बा.पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून पाटील यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. सप्टेंबर महिन्यात विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याने त्यापूर्वी केंद्र सरकारने दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा करून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने केली जात आहे. मात्र सध्या केंद्र व राज्यामधील सत्तेमध्ये असणारे भाजप व इतर राजकीय पक्ष नामकरणाच्या आंदोलन रस्त्यावर उतरून करत नसल्याने महाविकास आघाडीने नामकरणाच्या मुद्यावर आक्रमक होत आहेत. मनसेने यामध्ये अग्रेसर भूमिका घेऊन पनवेल महापालिकेने उभारलेल्या दिशादर्शक फलकाला काळे फासून आंदोलनाची सुरूवात केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai