Breaking News
पनवेल ः थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी पनवेल महापालिकेने शास्तीवर 90 टक्के सवलतीच्या जाहीर केलेल्या अभय योजनेला अजून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अभय योजना जाहीर केल्यापासून आतापर्यंत 60 दिवसांमध्ये 86,491 करदात्यांनी 280 कोटी 41 लाख रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला. यापैकी प्रत्यक्ष अभय योजनेचा लाभ 52,220 करदात्यांनी घेतला.
15 सप्टेंबर अभय योजनेचा अंतिम दिवस असल्याने एका दिवसात 4 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा कर एका दिवसात जमा करण्यात आला. पनवेल महापालिका क्षेत्रात तब्बल साडेतीन लाखहून अधिक करदाते आहेत. सूमारे पावणेतीन लाख करदात्यांकडून पनवेल महापालिकेला 1600 कोटी रुपये थकीत कर जमा करणे हेच महापालिकेसमोर आव्हान आहे. यामध्ये खारघरमधील करदाते तसेच तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि कामोठे, कळंबोली, आणि तळोजा पाचनंद, नावडे येथून मोठ्या प्रमाणात थकीत कर वसुलीचे आव्हान असल्याने महापालिकेच्या कर विभागाला पुढाकार घेऊन करदात्यांची मनधरणी करावी लागणार आहे. खारघर क्षेत्रातून 336 कोटी रुपयांचा थकीत कर आहे. तर तळोजा औद्योगिक वसाहतीमधून 227 कोटी रुपयांचा कर मिळणे महापालिकेला अपेक्षित आहे. तसेच कळंबोली, रोडपाली येथील 191 कोटी आणि तळोजा पाचनंद वसाहतीमधून 190 कोटी रुपयांचा थकीत कर आहे. कामोठे येथून 129 कोटी आणि नवीन पनवेल, खांदाकॉलनी येथून 84 कोटी रुपयांचा कर वसुलीसाठी महापालिकेला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. अभय योजनेचा पहिल्या टप्यात शास्तीवरील 90 टक्के माफीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून त्यानंतर दूसऱ्या टप्यात 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या काळात शास्तीमाफीवरील सवलत 75 टक्के करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी संबंधित अभय योजनेला अजून 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने करदात्यांना कर भरण्यासाठीची रक्कम जमा करण्याची तजवीज करण्याची वेळ मिळणार आहे.
महापालिकेने मालमत्तेचे इ बीलामार्फत डीजीटल (ऑनलाईन) भरणा केल्यास 2 टक्के सवलत देणार असून सौरउर्जा वापरणाऱ्या करदात्यांसाठी अजून 2 टक्के सवलती दिली आहे. जल पुनःभरणा करणाऱ्या करदात्यांसाठी 2 टक्के सवलत घनकचऱ्याची शास्त्रोक्तपद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या करादात्यांसाठी 2 टक्के सवलत दिली जाणार असल्याने जास्तीत जास्त करदात्यांनी या योजनांची लाभ घेण्याचे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai