पाच शहरांना नवी मुंबई पालिका करणार स्वच्छतेचे मार्गदर्शन
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 01, 2025
- 171
स्वच्छ शहर जोडी सामंजस्य करार संपन्न
नवी मुंबई ः शहरांतील परस्पर समन्वयाने शहर स्वच्छतेला गती मिळावी व स्वच्छता कार्यामध्ये अधिक प्रगती व्हावी या दृष्टीने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ शहर जोडी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दूरदृष्टी प्रणालीद्वारे या उपक्रमात संपूर्ण देशातील स्वच्छ शहर जोडी उपक्रमात निवडलेली विविध शहरे सहभागी झाली होती. यावेळी आंतर शहर जोडीचे सामंजस्य करार विविध शहरांमध्ये करण्यात आले.
स्वच्छ शहर जोडी उपक्रमांतर्गत देशभरातील 196 शहरांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण 72 मार्गदर्शक शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सुपर स्वच्छ लीग मध्ये समाविष्ट नवी मुंबई महापालिका शहरास महाराष्ट्र राज्यातील लोणार, केज, मलकापूर, जिंतूर, कन्नड या नगरपरिषदा स्वच्छ शहर जोडीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. या 5 शहरांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 तसेच परभणी जिल्ह्यातील 1 व विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील 2 अशा एकूण 5 शहरांचा समावेश आहे.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यापूर्वीच दूरदृश्य प्रणालीद्वारे या शहरांच्या मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधला असून स्वच्छ शहर जोडीमध्ये नवी मुंबई पालिका त्यांना संपूर्ण मार्गदर्शक सहकार्य करेल असा विश्वास दिलेला आहे. या पाच शहरांशी नवी मुंबई महापालिकेचा स्वच्छ शहर जोडी म्हणून सामंजस्य करार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित नगरपरिषदांच्या उच्च अधिकाऱ्यांसमवेत संपन्न झाला. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ अजय गडदे आणि पाचही नगरपरिषदांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता हीच सेवा अभियान कालावधीत स्वच्छ शहर जोडी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून शहरी स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत शहरांमधील सहकार्य मजबूत करण्यासाठी हा एक कालबद्ध आणि परिणाम केंद्रित उपक्रम आहे. दृश्यमान स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि वाहतूक, घनकचरा प्रक्रिया, स्वच्छतेची उपलब्धता, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा सेवांचे यांत्रिकीकरण आणि स्वच्छताकर्मींचे कल्याण, स्वच्छताकार्यात लोकसहभाग आणि नागरिकांचा अभिप्राय व सक्षम तक्रार निवारण प्रणाली अशा 8 विषयांवर केंद्रित क्षेत्रांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेसारखे मार्गदर्शक शहर आणि लोणार, जिंतूर, मलकापूर, केज, कन्नड अशा स्वच्छतेविषयी मार्गदर्शन घेणाऱ्या नगरपरिषदा असणाऱ्या शहरांमध्ये परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत होणार आहे. या पाच शहरांची स्वच्छ सर्वेक्षणातील रँकिंग कमी असून त्यांची रँकिंग उंचावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मार्गदर्शक सहकार्य करणार आहे. या उपक्रमाचे मूल्यांकन स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 दरम्यान केले जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai