ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर व आपुलकी जपणारे नवी मुंबई शहर
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 01, 2025
- 228
ज्येष्ठ नागरिक दिनी ज्येष्ठांकडून अभिप्राय
नवी मुंबई ः ज्येष्ठांकडे ज्ञानाचे भांडार असते ते त्यांनी समाजाच्या हितासाठी वापरावे अशी अपेक्षा व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका ज्येष्ठांना भावनिक आधार देण्याचे काम करते अशा हृद्य शब्दात ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर ज्येष्ठांकरिता आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तत्परतेने अधिकच्या कल्याणकारी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्णय घेतले असून त्याकरिता समस्त ज्येष्ठांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते. यावेळी से.8 सीबीडी बेलापूर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेने सादर केलेल्या स्वच्छता विषयावरील जनजागृतीपर लघुनाटिकेचा आधार घेत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेमधील मानांकनात लहानथोर सर्वच घटकांचा महत्वाचा वाटा असल्याचे सांगत मानवी जीवनाला व निसर्गाला घातक असणाऱ्या प्लास्टिकला नकार देण्याचे निश्चित ठरविले पाहिजे असे सांगितले. यावेळी बोलतांना अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी ज्येष्ठांच्या चेह-यावरील सुरकुत्या म्हणजे अनुभवसंपन्नता असल्याचे सांगत आपल्या वृध्द आई वडीलांना जपणे यासारखे पुण्याचे काम नाही असे मत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक संघटनांनी नागरी भागांप्रमाणेच गाव आणि झोपडपट्टी भागातील ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष तथा नमुंमपा ज्ेयष्ठ नागरिक स्वतंत्र कक्षाचे सदस्य अण्णासाहेब टेकाळे यांनी ज्येष्ठांची इतकी काळजी घेणारी व विविध सुविधा देणारी तसेच ज्येष्ठांचा स्वतंत्र कक्ष असणारी नवी मुंबई ही देशात सर्वात अग्रेसर महापालिका असल्याचे सांगत विरंगुळा केंद्र ही ज्येष्ठांचा मानसिक आधार असल्याचे मत व्यक्त केले. ज्येष्ठांकरिता आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तत्परतेने अधिकच्या कल्याणकारी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्णय घेतले असून त्याकरिता समस्त ज्येष्ठांतर्फे त्यांनी आभार व्यक्त केले. समाज विकास विभागाच्या उपआयुक्त नयना ससाणे यांनी ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेला आदर व आपुलकी प्रदर्शित करणारा हा कार्यक्रम असल्याचे सांगत यानिमित्त आयोजित केलेल्या 14 प्रकारच्या कलागुणदर्शन स्पर्धांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी ज्या उत्साहाने सहभाग घेतला तो स्पर्धा आयोजन केल्याचे समाधान देणारा असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी वयाची 75 वर्ष यावर्षी पूर्ण केलेल्या 135 ज्येष्ठ नागरिकांचा तसेच विवाहाची 50 वर्षे पूर्ण करणाऱ्या 14 ज्येष्ठ नागरिक दांम्पत्यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी श्री. जयंत ओक यांचाही वयाच्या अमृत महोत्सवा निमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी कॅरम, बुध्दीबळ, ब्रीझ, एकपात्री अभिनय, वेशभुषा, काव्यवाचन, गायन, नृत्य, नाटीका, कथाकथन, हास्य, टेलिफोन, टपाल पत्र लेखन, निबंध अशा 14 स्पर्धांतील विजेत्या ज्येष्ठ नागरिकांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धांचे परीक्षक कवी मोहन काळे, नृत्य कलावंत रवीराज अडसुळ व रेणूका धिरंगी आणि इतर स्पर्धांच्या परीक्षकांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनीही आपले सादरीकरण करुन आनंदरंग मिसळला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai