नालायकांच्या हातात नवी मुंबईची सत्ता नको
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 03, 2025
- 150
गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंना डिवचले
नवी मुंबई ः पालिका निवडणुकीची वेळ जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कलगीतुरा वाढू लागला आहे. गणेश नाईक शिंदेसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत याउलट शिंदे मात्र कोणताही प्रतिसाद न देता अनुल्लेखाने नाईकांना त्यांची जागा दाखवत आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा एका कार्यक्रमात नालायकांच्या हाती नवी मुंबईची सत्ता देऊ नका असे आवाहन नाईकांनी नवी मुंबईकरांना करुन शिंदेंना डिवचले आहे.
वाशी येथे नाईकांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित 100 सेवाभावी उपक्रमांच्या सुवर्ण गौरव महोत्सवावेळी आ. गणेशनाईक यांनी 14 गावे व युती यावर भाष्य करताना एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका केली. त्यांनी युती झाली वा नाही झाली तरी महापौर भाजपचाच असेल असा विश्वास व्यक्त केला होता. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, भाजपच्या कतृत्वान कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तर, ही युती व्हावी अशी माझी इच्छा राहील. परंतू, कार्यकर्त्यांचा सन्मान नाही झाला तर, युती होऊ नये यासाठी मी आग्रही असेल. नाईकांच्या या वक्तव्यामुळे नाईकांनाच युती नको असल्याचा संदेश दिला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यानंतर महापालिकेने केलेली प्रभाग रचना यावरही भाष्य करत पालिका प्रशासनासह अप्रत्यक्षपणे शिंदेसेनेला धारेवर धरले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हट्टापोटी पालिकेत समाविष्ट केलेल्या 14 गावांच्या मुद्द्यालाही त्यांनी हात घालत महापालिका निवडणुकीनंतर ही सर्व गाव आपण बाहेर काढू. कोणाच्यातरी लहरीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोझा आमच्या नवी मुंबईच्या जनेतवर आम्ही का टाकू असा प्रश्न नाईकांनी उपस्थित केला. त्यामुळे निश्चित सर्व गाव बाहेर निघतील, असा दावा त्यांनी छातीठोकपणे केला.
वाढलेल्या चटईक्षेत्रामुळे नवी मुंबई शहराचे वाटोळे होईल हे भाष्य करताना त्यांनी भविष्यात जर नालायक लोकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिका सत्ता गेली तर या शहराचा वाटोळ झालं म्हणायचे, असा हल्लाबोल त्यांनी शिंदे सेनेवर केला. हे बोलताना त्यांनी आपण हे विधान जबाबदारीने करत असल्याचे स्पष्ट केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर आपण झोप उडवील असा पैसा न कमविल्याने आपल्याला आयकर व सीबीआयची भिती नसल्याचा चिमटा शिंदे यांच्या शिवसेना फोडीवर काढल्याचे बोलले जाते. नाईकांच्या कोणत्याही वक्तव्याला आजतागायत शिंदे यांनी थेट उत्तर न देता त्यांचे कार्यकर्ते प्रत्युत्तर देत असून शिंदे मात्र उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधत असल्याने नाईक आपल्या खिजगणतीत नसल्याचे ते अप्रत्यक्षपणे सुचवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता नाईकांच्या या वक्तव्याचा शिंदेसेना कसा समाचार घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai