सणांच्या काळात भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2025
- 77
अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी
मुंबई : सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ‘सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षेचा’ या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1 हजार 594 अन्न पेढ्यांची तपासणी करण्यात आली असून 2 हजार 369 अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री झिरवाळ म्हणाले, या तपासणी मोहिमेत दूध, खवा, तूप, खाद्य तेल, मिठाई, सुकामेवा आणि चॉकलेटसारख्या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले आहेत. आतापर्यंत 554 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 513 नमुने प्रमाणित, 26 कमी दर्जाचे 4 लेबल दोष असलेले आणि 11 नमुने असुरक्षित असल्याचे आढळले आहेत. उर्वरित 1 हजार 815 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने 2022 पासून प्रलंबित 200 हून अधिक सहायक आयुक्त (अन्न) आणि अन्न सुरक्षा अधिकारी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. या बरोबरच अन्न व औषध प्रशासनाला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन 750 पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात येत असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
अन्न नमुन्यांचे वेळेत विश्लेषण करण्यासाठी राज्यात प्रयोगशाळांचे बळकटीकरण केले जात आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील नवीन प्रयोगशाळांचे बांधकाम पूर्ण झाले असून या प्रयोगशाळांचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळा प्रभावीपणे चालवण्यासाठी 250 नवीन पदांचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्यात येत आहे. प्रयोगशाळांच्या बळकटीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंत्री झिरवाळ म्हणाले, हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च ॲन्ड टेस्टिंग या संस्थेमध्ये पोलिओ लस निर्मितीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, तर सर्प दंशावरील लस निर्मितीसाठी 1 कोटी 50 लाखाचा निधी अर्थसंकल्पीत केला आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ केली जाईल. तसेच डॉ. माशेलकर समितीच्या शिफारशीनुसार एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात वैद्यकीय शिक्षण, वित्त नियोजन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांचा समावेश असल्याचेही ते म्हणाले.
दुधातील भेसळ रोखण्यासाठी तपासणी मोहीम अधिक व्यापक केली जाणार असल्याचे सांगून मंत्री झिरवाळ म्हणाले, जीएसटी कमी झाल्याने औषधांच्या किंमत कमी झाल्या आहेत. जे औषध विक्रेते कमी झालेल्या किंमतीनुसार औषधाची विक्री करणार नाही त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai