फेस रिकग्निशन आयडेंटिफिकेशन प्रणालीची मागणी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2025
- 133
नवी मुंबई - महाराष्ट्र शासनाने 21 मार्च 2018च्या शासन निर्णयाद्वारे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अनिवार्य केली आहे. मात्र सिडको, नवी मुंबई महापालिका, कोकण भवन येथे या प्रणालीचे पालन होत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्याधर्तीवर या विभागात फेस रिकग्निशन आधारित बायोमेट्रिक प्रणाली तातडीने कार्यान्वित करावी व वेतनप्रक्रियेला बायोमेट्रिक हजेरीशी थेट जोडण्यात यावे अशी मागणी सजग नागरी मंचाने संबंधित प्राधिकरणांना निवेदनाद्वारे केली आहे.
शासन निर्णयानुसार बायोमेट्रिक प्रणालीचे पालन न करणे ही बाब प्रशासकीय शिस्तभंगास पात्र ठरते. नवी मुंबई पालिका मुख्यालय, सिडको, कोकणभवन या संकुलामध्ये या प्रणालीचे सऱ्हास उल्लंघन होत असल्याचे सजग नागरी मंचाने प्रत्यक्ष पाहणी व आरटीआयद्वारे उघड केले आहे. त्याचबरोबर कनिष्ठ आणि वरिष्ठ यांना वेगवेगळा न्याय असाही प्रकार बऱ्याचदा घडला आहे. 24 सप्टेंबर 2025 रोजी सजग नागरिक मंचाच्या वतीने सिडको कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कार्यालयीन वेळ सकाळी 9.30 ते सायं. 5.30 असूनही, त्या दिवशी तीन सह-व्यवस्थापकीय संचालक, प्रशासन व्यवस्थापक, कार्मिक व्यवस्थापक, मुख्य दक्षता अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी व मुख्य सुरक्षा अधिकारी असे अनेक अधिकारी 10:30 पर्यंत अनुपस्थित असल्याचे आढळले. यावरून स्पष्ट होते की बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचे पालन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत नाही. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत ‘फेस रिकग्निशन आयडेंटिफिकेशन प्रणाली‘ अंमलात आणलेली असून ती पारदर्शक व प्रभावीपणे कार्यरत आहे. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तालय, सिडको व नवी मुंबई महानगरपालिका यांनीही ही प्रणाली तातडीने सुरू करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 नुसार शासकीय सेवेत वेळेत उपस्थिती व शिस्तपालन बंधनकारक असून, त्यास अपवाद ठेवणे हा गंभीर शिस्तभंगाचा प्रकार ठरतो. म्हणूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीही हजेरी बंधनकारक असावी. त्याबरोबर सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या वेतनप्रक्रियेला बायोमेट्रिक हजेरीशी थेट जोडण्यात यावे अशी मागणी सजग नागरीक मंचाने केली आहे.
राज्य सरकारने नुकतेच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात असताना ओळखपत्र परिधान करणे अनिवार्य केलेले आहे. परंतू बहुतांश कर्मचारी-अधिकारी हे या नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. सदरील शासन परिपत्रकान्वये ओळखपत्र परिधान करणे सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना अनिवार्य करावे. कार्यालयामध्ये फेस आयडेंटिफिकेशन ओळख प्रणाली सुरु केल्यास त्याचा फायदा कार्यालयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील फायदा होऊ शकेल. कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या अभ्यागतांची ओळख पटवणे सोयीचे होईल. त्यामुळे, सदर निवेदनाची तातडीने कायदेशीर व प्रशासकीय दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, ही विनंती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai