प्रश्नमंजुषा स्पर्धेतून मराठी भाषेच्या माहितीचे आदान-प्रदान
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2025
- 63
नवी मुंबई ः अभिजात मराठी भाषेचा आपण अभिमान बाळगतो, तिचा उत्सव साजरा करतो. त्यामुळे आपल्याला मराठी भाषेच्या इतिहास व परंपरेची किती माहिती आहे, त्यामधील साहित्याची किती जाण आहे याबाबतचा अप्रत्यक्ष आढावा घेणारी अभिनव ‘प्रश्नमंजुषा स्पर्धा’ महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अत्यंत उत्साहात संपन्न झाली. यामध्ये महापालिका विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह साहित्यप्रेमी नागरिकांनीही उत्साहाने सहभागी होत साहित्याच्या उत्सव साजरा केला.
नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिलखुलास शैलीत मराठी भाषेतील गंमतीजमती व आठवणी सांगत प्रश्नोत्तरांचा हा कार्यक्रम रुक्ष होऊ न देता उपस्थितांना मराठी साहित्याविषयी बोलते करीत संस्मरणीय केला. यावेळी मराठी भाषा व मराठी साहित्य विषयक विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उपस्थित श्रोत्यांनी उत्तर दिल्यानंतर लगेचच पुस्तकरुपी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अभिजात मराठी भाषा, तिची परंपरा, संत पंत तंत कवितांचा प्रवाह, ज्ञानपीठ भारतरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार, गीत काव्य कादंबरी विषयक माहिती, बोलीभाषा, साहित्यिकांची टोपण नावे अशा विविध माहितीपर प्रश्नांनी व त्यावरील वेगवेगळया उत्तरांनी तसेच त्या अनुषंगाने दिल्या गेलेल्या पूरक माहितीने हा कार्यक्रम रंगला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेव्दारे मराठी विषयीचे माहिती व ज्ञान कोणाला किती आहे याची प्रचिती आलीच, यासोबतच आपल्याला ठाऊक नसलेली माहितीही इतरांनी दिलेल्या उत्तरांमधून मिळाली, त्यामुळे हा उपक्रम मराठी भाषेविषयी ज्ञान वाढविणारा असून योग्य उत्तर दिल्यानंतर पारितोषिक मिळत असल्याने आपल्या ज्ञानाचे कौतुकही करणारा असल्याने अतिशय आवडल्याचे अनेकांनी सांगितले.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेते 50 रसिकांना अचूक उत्तरे दिल्याने पुस्तक स्वरुपात परितोषिक देऊन गौरविण्यात आले. अत्यंत सहजसुंदर पध्दतीने सुसंवादी स्वरुपात संपन्न झालेल्या या उपक्रमामुळे मराठी भाषेविषयी माहिती व ज्ञानात लक्षणीय भर पडली असे अभिप्राय उपस्थित अनेक श्रोत्यांनी व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासह श्रोत्यांनीही ‘सूख म्हणजे नक्की काय असतं’ या गाण्याच्या सूरात सूर मिसळला आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेची सांगता झाली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai