विमानतळ पोलीस ठाण्यासाठी मान्यता
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 11, 2025
- 80
नवी मुंबई : उलवे नोडमधील वाढते नागरीकरण आणि भविष्यात विमानतळ परिसरात वाढणारी प्रवासी संख्या या पार्श्वभुमीवर सुरक्षेसाठी गृह विभागाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नवीन ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे’ स्थापन करण्यास औपचारिक मान्यता दिली आहे. सोमवारी (ता. 6) जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, विद्यमान पनवेल शहर आणि उलवा पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र विभाजित करून हे स्वतंत्र ठाणे उभारले जाणार आहे.
उलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढते शहरीकरण आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्वतंत्र विमानतळ पोलीस ठाणे निर्माणाचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव विमानतळ सुरू होण्यापूर्वी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची शासन दरबारी पदनिर्मिती, पोलीस ठाणे इमारत बांधणीचे काम होणे आवश्यक असल्याने सिडको मंडळ आणि शासनाकडे वारंवार पोलीस विभागाचा पाठपुरावा सुरू होता. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या या प्रयत्नांना यश आले असून या नव्या पोलीस ठाण्यासाठी 108 नियमित पदे निर्माण करण्यात आली आहेत. या पदांवरील आस्थापना खर्चासाठी शासनाने 3 कोटी 38 लाख रुपये आणि इमारतीमधील वाहन व इतर साहीत्यासाठी एक कोटी 76 लाखांच्या खर्चाची तरतूदीला मंजूरी दिली आहे.
या पोलीस ठाण्यात 2 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 6 उपनिरीक्षक, 6 सहाय्यक उपनिरीक्षक, 27 हवालदार, 42 पोलीस शिपाई, 19 महिला शिपाई आणि 3 चालक पोलीस शिपाई अशी मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील एक महत्त्वाचे प्रकल्प असून, त्यामध्ये 4 प्रवासी टर्मिनल, 2 धावपट्टी (रनवे) आणि 1 कार्गो ट्रक टर्मिनल उभारले जात आहेत. विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर दरवर्षी 9 कोटी प्रवासी आणि 360 कोटी मेट्रिक टन मालवाहतूक होणार आहे. अशा मोठ्या प्रमाणातील वाहतूक आणि गर्दी लक्षात घेता सुरक्षाव्यवस्था मजबूत करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
नवीन पोलीस ठाणे उभारल्याने विमानतळ परिसरात कायदा व सुव्यवस्था, प्रवासी सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई पोलिसांना विमानतळ परिसरात स्वतंत्र आणि सुसज्ज सुरक्षा यंत्रणा उभारण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाने हा निर्णय वित्त विभागाच्या मंजुरीनंतर अमंलात आणला असून, लवकरच ठाण्याच्या हद्दनिश्चितीचा प्रस्ताव शासनास सादर केला जाणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai