Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ‘व्हॉलीबॉल’ स्पर्धेचे आयोजन टिळक ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड सायन्स, नेरुळ येथील सुसज्ज मैदानावर अतिशय उत्साहात संपन्न झाले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत व्हॉलीबॉल खेळातील 14,17 व 19 वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात एकूण 153 शाळांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धा टिळक ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड सायन्स,नेरूळ येथील शाळेच्या मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपट्टू, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या शुभहस्ते, टिळक ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक डॉ.अजित कुरुप, प्राचार्या डॉ. हिना समानी, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, नमुंमपा जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन समिती सदस्य धनंजय वनमाळी, शैक्षणिक प्रशासक अनिल नायर व श्री.सुनिल नायर, इतर सर्व शाखांचे प्राचार्य आणि पर्यवेक्षक व निवेदिका श्रीम.टिना यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेतील 14 वर्षाआतील वयोगटाच्या मुलांचा अंतिम सामना नॉर्थ पॉईंट स्कूल कोपरखैरणे आणि साधू वासवानी स्कूल सानपाडा यांच्यात होऊन यामध्ये नॉर्थ पॉईंट शाळेच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत अजिंक्यपद पटकावले. 14 वर्षाआतील वयोगटात मुलींचा अंतिम सामना नॉर्थ पॉईंट स्कूल आणि साधू वासवानी स्कूल सानपाडा यांच्यात होउुन या सामन्यात नॉर्थ पॉईंट स्कूल शाळेच्या संघाने अत्यंत दोन सेटमध्ये जिंकत अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेतील 17 वर्षाआतील मुलांच्या गटात अंतिम सामना एस.एस.हायस्कूल, नेरुळ आणि अमृता विद्यालयम, नेरुळ यांच्यात होउुन या सामन्यात एस. एस. हायस्कूल, शाळेच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत दोन सेटमध्ये सामना जिंकत अजिंक्यपद पटकावले. 17 वर्षाआतील मुलींच्या गटातील अंतिम सामना नॉर्थ पॉईंट स्कूल कोपरखैरणे आणि न्यु होरायझन पब्लिक स्कूल,ऐरोली यांच्यात झालेल्या सामन्यात नॉर्थ पॉईंट शाळेच्या संघाने दोन सेटमध्ये जिंकून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. मुलांच्या 19 वर्षाआतील वयोगटातील अंतिम सामना सुशिलादेवी देशमुख ज्युनिअर कॉलेज, ऐरोली आणि एस.एस.हायस्कूल,नेरुळ यांच्यात होउुन या अंतिम सामन्यात सुशिलादेवी देशमुख ज्युनिअर कॉलेज, ऐरोलीच्या संघाने अजिंक्यपद पटकावून मुंबई विभाग स्तर स्पर्धेसाठी पात्रता संपादन केली. या स्पर्धेत 19 वर्षाआतील मुलींच्या गटातील अंतिम सामना नॉर्थ पॉईंट स्कूल,कोपरखैरणे आणि अमृता विद्यालयम, नेरुळ यांच्यात होउुन या अंतिम सामन्यात नॉर्थ पॉईंट स्कूल कोपरखैरणे शाळेच्या संघाने सामना जिंकून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्रता सिध्द केली.
स्पर्धा आयोजनासाठी टिळक एज्युकेशन सोसायटी नेरुळचे संचालक डॉ.अजित कुरुप व प्राचार्य डॉ.हिना समानी, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे मुंबई विभागाचे सचिव श्री.धनंजय वनमाळी आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे मोलाचे सहकार्य लाभले. या नमुंमपा जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 14,17 व 19 वर्षाआतील मुला - मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून पुढील मुंबई विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघांना महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शुभेच्छा प्रदान केल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai