Breaking News
70 कार्यकारिणी सदस्य; 111 विशेष निमंत्रित
नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदावर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे समर्थक राजेश पाटील यांची निवड करुन गणेश नाईक यांना धक्का देण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारणीत म्हात्रे समर्थक पदाधिकाऱ्यांची मोक्याच्या जागांवर वर्णी लागली असून नाईक समर्थकांना निमंत्रितांच्या यादीत मानाचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई पक्षसंघटनेवर चांगलीच पक्कड मिळवल्याची चर्चा असून संदीप नाईकांच्या चुकीच्या राजकीय खेळीची मोठी किंमत नाईकांना चुकवावी लागल्याचे बोलले जाते.
गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात (शरद पवार) प्रवेश केल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद बराच काळ रिक्त होते. या पदासाठी यापुर्वी गणेश नाईक यांचे पुतणे आणि माजी महापौर सागर नाईक शर्यतीत होते. या शर्यतीत बाजी मारत आमदार मंदा म्हात्रे यांनी शिरवणे गावातील पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ.राजेश पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात यश मिळविले. डॉ.पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही बराच काळ पक्षाची कार्यकारणी ठरली नव्हती. दरम्यानच्या काळात गणेश नाईक यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले. रविंद्र चव्हाण यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यात नाईकांच्या रुपाने पक्षाकडे एकमेव मंत्रीपद आहे. दोन दिवसांपुर्वी भाजपची नवी मुंबई कार्यकारणी जाहीर झाली असून येथेही आ. मंदा म्हात्रे यांचा वरचष्मा असल्याचे दिसते. संदीप नाईकांनी विधानसभा निवडणुकीवेळी खेळलेल्या एका चुकीच्या खेळीमुळे नाईकांचा बालेकिल्ला असणाऱ्या नवी मुंबईत मात्र पक्ष संघटनेवर त्यांची पुर्ण पकड राहिली नसल्याचे यावरुन दिसते आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या उद्धाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत होते, त्याच दिवशी डॉ.राजेश पाटील यांनी पक्षाची कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये संघटन, संतुलन आणि अनुभवाला अधिक महत्व देण्यात आले आहे. भाजपच्या आणि वरिष्ठ नेत्यांना आणि नगरसेवकांना महत्वाचे स्थान दिले आहे. या कार्यकारणीत चार महामंत्री, आठ उपाध्यक्ष, आठ सचिव आणि एक खजिनदार यांच्यासह 70 कार्यकारिणी सदस्य, युवा, महिला,ओबीसी आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. तर 111 विशेष निमंत्रितांची यादी जाहीर केली आहे. या कार्यकारणीत वन मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बहुसंख्य माजी पदाधिकाऱ्यांची रवानगी निमंत्रितांच्या यादीत करण्यात आली आहे. माजी जिल्हाअध्यक्ष रामचंद्र घरत यांनादेखील विशेष निमंत्रितांच्या यादीत बसवण्यातआले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai