पाण्यासाठी नागरिकांची सिडको भवनवर धडक
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 28
बुधवारी कामोठेकरांचा रोष तर गुरुवारी नवी पनवेलकरांचा हंडा मोर्चा
पनवेल ः अनेक महिन्यांपासून कामोठेकरांप्रमाणेच नवीन पनवेल वसाहतीमधील नागरीक पाणीटंचाईने बेहाल झाले आहेत. दिवाळी सणामध्ये अभ्यगस्नान करण्यासाठीसुद्धा पाणीपुरवठा न झाल्याने प्रचंड संताप पसरला आहे. अखेर बुधवारी सिडको भवन येथे भाजप पदाधिकारी आणि नागरिकांनी सिडकोविरोधात तीव्र संताप व्यक्त करत पाणीपुरवठ्याच्या अडचणींवर तोडगा काढण्याची मागणी केली. तर गुरुवारी नवीन पनवेल वसाहतीमधील नागरिकांना सोबत घेऊन पिण्याचे पाणी व्यवस्थित पुरवठा करा या मागणीसाठी शेकाप महाविकास आघाडीने नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयावर गुरुवारी मोर्चाचे आयोजन केले. यावेळी सिडकोने कार्यालयाचे मुख्य प्रवेशव्दार मोर्चेकरांसाठी बंद केल्याने मातीचे हंडे घेऊन सिडकोच्या प्रवेशव्दारावर फेकून आंदोलकांनी त्यांचा रोष जाहीर केला.
कामोठे परिसरातील पाण्याच्या तीव्र टंचाईविरोधात संतप्त नागरिक आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बेलापूर येथील सिडको भवनावर मोर्चा घेऊन धडकले. महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या या आंदोलनात लोकांचा आक्रोश स्पष्टपणे दिसत होता. आक्रमक घोषणांनी सिडको भवनाचा परिसर बुधवारी हादरला. मोर्चेकऱ्यांचा वाढता जमाव पाहून सिडको प्रशासनाने प्रवेशद्वार तातडीने बंद केले. सिडकोचे सुरक्षारक्षक, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्ते “सिडको अधिकारी खाली या” अशा जोरदार घोषणा देत राहिले. शेवटी सिडकोच्या दक्षता विभाग प्रमुख सुरेश मेंगडे आणि सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी माजी नगरसेवक विकास घरत, भाजपचे रविंद्र जोशी यांच्यासह प्रतिनिधी मंडळाला चर्चेसाठी बोलावले. बैठकीत ‘मंजूर मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करा’, ‘गळती व दूषित पाणी रोखा’, ‘कमी दाबाचा प्रश्न सोडवा’ अशा मागण्या नागरिकांनी ठामपणे मांडल्या. चर्चेनंतर सिडको प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले. कामोठेतील जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू असल्याने काही विलंब होत असला तरी पाणीपुरवठा स्थिर करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच पाणी चोरी रोखण्यासाठी चार सदस्यीय तपास पथक जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करणार असून, दररोजच्या पाणीपुरवठ्याची नोंद जलमापकावर ठेवण्याचे आदेश डॉ. दयानिधी यांनी दिले.
गुरुवारी नवीन पनवेलमध्ये काढलेल्या मोर्चातही सिडकोकडून मिळणारे पाणी आवश्यकतेनूसार पुरवठा करा, खोटी आश्वासने देऊ नका, अधिका-यांनी संवाद साधा यासोबत हॉटेल, वाहन धुण्याच्या सर्व्हीस स्टेशन आणि इमारत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांच्या पूर्वी पिण्यासाठी पुरवठा करा अशी मागणी शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शिरीष घरत, अवचित राऊत, मनसेचे योगेश चिले, शेकापचे प्रकाश म्हात्रे ही मंडळी मोर्चेकरांचे नेतृत्व करत होते.
सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणची कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय त्या तक्रारीची तपासणी करण्यासाठी कर्मचारी पाठवून तक्रारींचे निराकरण केले जाईल असे सांगीतले. जिर्ण जलवाहिन्यांविषयी तक्रार असल्यास त्याची सुद्धा पडताळणी केली जाईल असे आश्वासन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकरांना दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai