वीजबिलांच्या नावातील बदल अर्जांना स्वयंचलित मंजूरी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 55
डिजिटल ग्राहकसेवेत महावितरणचे एक पाऊल पुढे
मुंबई : दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवेसाठी महावितरणने वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल करण्याच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्यास सुरवात केली आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ तीन ते सात दिवसांमध्ये वीजबिलावरील ग्राहक नावामध्ये बदलाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यापूर्वी या प्रक्रियेस कृती मानकानुसार एक महिन्याचा कालावधी लागत होता.
राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना तत्पर व घरबसल्या सेवा देण्यासाठी महावितरणच्या डिजिटल सेवेत ग्राहकाभिमुख बदल करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बिलावरील ग्राहक नावात बदल करण्याच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नुकतीच ऑनलाइन प्रणाली विकसित व कार्यान्वित करण्यात आली आहे. खरेदी-विक्री, वारसा हक्क किंवा इतर कारणांमुळे घर किंवा इतर मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यानंतर वीजबिलाच्या ग्राहक नावात बदल करण्यासाठी अर्ज करण्यात येतो. या प्रक्रियेसाठी महावितरण मोबाईल ॲप व संकेतस्थळावर वीजग्राहकांना ‘लॉग-इन’द्वारे ऑनलाइन अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व प्रक्रिया शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांचे अर्ज, छाननी व मंजूरी या प्रक्रियेसाठी मा. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या कृती मानकांप्रमाणे एक महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. आता महावितरणकडून या अर्जांना स्वयंचलित मंजूरी मिळत असल्याने नावात बदल करण्याची कार्यवाही केवळ तीन ते सात दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे.
ग्राहक नावात बदल करण्याचा ऑनलाइन अर्ज व अपलोड केलेल्या कागदपत्रांची संबधित उपविभाग कार्यालयाकडून तपासणी होईल. त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधित ग्राहकांना लगेचच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल. सोबतच ग्राहक नावात बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेशही ग्राहकांना पाठविण्यात येईल. ग्राहक नावात बदल करण्याच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी मिळणार असल्याने प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह इतर ग्राहकांना महावितरणच्या डिजिटल सेवेचा तत्पर लाभ होणार आहे.
महावितरणने याआधी लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या 157 केडब्लूपर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ केला आहे. त्याचा वीजग्राहकांना मोठा लाभ झाला आहे. गेल्या महिन्याभरात 2460 औद्योगिकसह 4 हजार 164 वीजग्राहकांनी एका क्लिकवर वीज भारामध्ये तब्बल 22 हजार किलोवॅटने वाढ केली आहे. त्यानंतर आता वीजबिलांवरील ग्राहक नावात बदल करण्याची मंजूरी स्वयंचलित केल्याने डिजिटल ग्राहकसेवेत महावितरणने मोठी आघाडी घेतली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai