राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये नवी मुंबई महापालिका देशात प्रथम
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 14, 2025
- 101
नवी मुंबई ः ‘सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024’ अंतर्गत सर्वोत्तम राज्य श्रेणीत महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर गुजरात आणि हरियाणा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिकेने देशात प्रथम पुरस्कार पटकाविला आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारे ‘सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024’ जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिकेने देशात प्रथम पुरस्कार पटकाविला असून नवी मुंबई महापालिकेच्या शिरपेचात आणखी एका राष्ट्रीय पुरस्काराचा मानाचा तुरा खोवला गेला आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून 18 नोव्हेंबरला नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. देशातील प्रत्येक स्तरावर जलसंरक्षण आणि जलसाक्षरतेला चालना देणे हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश असून ‘जल समृद्ध भारत’ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या पुरस्कारांसाठी देशभरातून 751 प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तपशीलवार अहवाल सादर केले. त्यानंतर स्वतंत्र निर्णायक मंडळाने पारदर्शक स्कोअरकार्ड पद्धतीने विजेत्यांची निवड केली. यामध्ये स्थानिक स्वराज संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिका देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय जलपुरस्काराची मानकरी ठरली आहे. शाश्वत जल व्यवस्थापन आणि जलसंवर्धनाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी तसेच जबाबदार नागरी सहभागासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी ट्विट करून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. महानगरपालिकेच्या या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
नवी मुंबई पालिकेचे जलसंवर्धन आणि व्यवस्थापन उपक्रम
- 100% पाणीपुरवठा आणि गळती नियंत्रण यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक घराला पिण्यायोग्य पाण्याचा 100% नियमित पुरवठा सुनिश्चित करणे आणि वितरण प्रणालीतील पाण्याच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यावर विशेष लक्ष दिले.
- शहरात मोठ्या प्रमाणात भूजल पुनर्भरण विहिरी आणि शोषखड्डे बांधणे, ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
- सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करूनते पाणी बिगर-पिण्याच्या कामांसाठी (उदा. बागांची निगा, बांधकाम, अग्निशमन) पुनर्वापर करणे. यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होते.
- औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी वापराच्या पाण्याचे नियमित लेखापरीक्षण करून पाण्याचा अपव्यय ओळखणे आणि तो थांबवण्यासाठी उपाययोजना करणे.
- जलमित्र अभियान आणि जनजागृती जलसंवर्धनासाठी नागरिकांमध्ये, शाळांमध्ये आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करणे. पाणी बचतीसाठी नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे.
- मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक करणे.
- सर्व नवीन आणि मोठ्या बांधकामांना पावसाचे पाणी साठवणे बंधनकारक करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे.
- या सर्व शाश्वत आणि प्रभावी उपाययोजनांमुळे नवी मुंबई महानगरपालिकेने जल व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी केली आणि देशाला एक आदर्श मॉडेल सादर केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai