नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता मतदार यादी कार्यक्रम जाहीर
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 81
नवी मुंबई ः राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादी दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या दि. 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या 150 ऐरोली, 151 बेलापूर व 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीवरून महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे. ही यादी दि.20 नोव्हेंबर 2025 रोजी महापालिका मुख्यालय तसेच संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
या प्रारूप मतदार यादीवर दि. 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार असून प्राप्त हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 5 डिसेंबर 2025 रोजी अधिप्रमाणित करून प्रसिध्द करावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे 08 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तसेच 12 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. दर मतदार यादीची प्रत प्रतिपृष्ठ रू. 2 इतका दर आकारून उपलब्ध करून देण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोग स्वतंत्रपणे मतदार यादी तयार करत नसून भारत निवडणूक आयोगाकडून तयार होणारी विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येते. या करिता 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करुन मतदार यादी तयार करण्यात येते. ही प्रारुप मतदार यादी राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार प्रसिध्द करण्यात आली आहे. या प्रारुप मतदार यादीत नव्याने कोणतेही नाव समाविष्ट होणार नसून प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादीत-(1) लेखनिकांच्या काही चुका असल्यास, (2) दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असल्यास, (3) संबधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही महानगरपालिकेच्या संबधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे समाविष्ट करणे, (4) मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्यास त्यांची नोंद मार्क कॉपी मध्ये घेणे केवळ अशा प्रकारची सुधारणा/दुरुस्ती करता येईल. विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करुन आवश्यक त्या सुधारणा मतदार यादीमध्ये करण्यासाठी व अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून विभाग प्रमुख व त्यांना सहाय्यक म्हणून इतर अधिकारी, कर्मचारी यांची विभाग कार्यालयनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे.
दिघा विभाग कार्यालयात प्रभाग क्र.1,2,3 व ऐरोली विभाग कार्यालयात प्रभाग क्र. 4,5,7 आणि घणसोली विभाग कार्यालयात प्रभाग क्र. 6,8,9 तसेच कोपरखैरणे विभाग कार्यालयात प्रभाग क्र. 10,11,12,13 या प्रभाग क्रमांकांशी संबंधित प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना विहित नमुन्यात दाखल करता येतील. अशाचप्रकारे तुर्भे विभाग कार्यालयात प्रभाग क्र. 14,15,19 व वाशी विभाग कार्यालयात प्रभाग क्र. 16,17,18 आणि नेरूळ विभाग कार्यालयात प्रभाग क्र. 20,21,22,23,24,25 तसेच बेलापूर विभाग कार्यालयात प्रभाग क्र. 26,27,28 या प्रभाग क्रमांकांशी संबंधित प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना विहित नमुन्यात दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता मतदार यादीच्या कार्यक्रमाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai