सफाई कामगारांना जास्तीत जास्त सुविधा द्या
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 40
सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांची पालिकेचा सूचना
नवी मुंबई ः महानगरपालिका मुख्यालयाला महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी भेट देत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ.राहुल गेठे यांनी महानगरपालिकेच्या वतीने अध्यक्ष महोदयांचे स्वागत केले.
परिमंडळ 2 चे उपआयुक्त संजय शिंदे यांनी सादरीकरणाव्दारे अध्यक्ष महोदयांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेसाठी करीत असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नेहमीच आघाडीवर असलेले शहर असून यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीगमध्ये नवी मुंबईचा समावेश झाला असल्याची माहिती देत यामध्ये स्वच्छताकर्मींच्या समर्पित कामाचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दैनंदिन स्वच्छतेत यांत्रिकी वाहने व साहित्याचा प्रभावी वापर तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना आणि लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली कार्यवाही याबाबतही माहिती देण्यात आली. यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत समाजकल्याण विभागाच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यांचा लाभ सफाई कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन विशेष शिबिर राबवावे अशी सूचना केली. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेत मोठया संख्येने सफाई कर्मचारी हे कंत्राटी पध्दतीने कार्यरत असून ते सेवानिवृत्त होताना त्यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा असे सूचित करतानाच त्यांना रमाई घरकुल योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असेही अध्यक्ष महोदयांमार्फत सूचित करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने कॅशलेस कार्ड योजना राबवावी अशा सूचना दिल्या. समान काम-समान वेतन लागू करणे, धुलाई भत्ता वाढविणे याबाबतही कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले.
सफाई कर्मचारी हे शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे काम सैनिकाच्या निष्ठेने करत असून त्यांच्या कामाप्रती आदर राखत त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेने कटिबध्द राहावे असे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी आढावा बैठकीप्रसंगी सूचित केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai