मेट्रो प्रवाशांनी गाठला 1 कोटींचा टप्पा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 72
दोन वर्षात दैदीप्यमान यश
नवी मुंबई ः सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र.1 बेलापूर ते पेंधर वरील मेट्रो सेवेने सुरू झाल्यापासून ते आजतागायत या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रवासी संख्येचा एकूण 1,15,28,297 इतका टप्पा गाठला आहे. सिडको मेट्रोच्या या देदीप्यमान यशाकरिता सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मेट्रोच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याकरिता नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला असून दि. 17 नोव्हेंबर 2023 पासून या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. मेट्रोची सेवा मा. पंतप्रधान यांच्या शुभहस्ते दि. 12 जानेवारी 2024 रोजी देशाला समर्पित करण्यात आली. या मेट्रो सेवेमुळे सीबीडी बेलापूर, खारघर आणि तळोजा परिसराला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे.
मेट्रो सेवा अधिक कार्यक्षम करण्याकरिता सिडकोतर्फे वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करण्यात येऊन सध्या गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी बेलापूर व तळोजा स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांना मेट्रोच्या फेऱ्या उपलब्ध आहेत. तर उर्वरित वेळांमध्ये दर पंधरा मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध आहे. मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात येऊन सध्या तिकीटाचा किमान दर रु. 10 व कमाल रु. 30 इतका आहे. या प्रवासीस्नेही सुधारणांमुळे सदर मार्गावरील मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यामुळे अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये मेट्रोच्या प्रवासी संख्येचा एक कोटीहून अधिक टप्पा गाठणे शक्य झाले आहे. मेट्रो मार्ग क्र. 1 चा विस्तार बेलापूरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत करण्यात येणार आहे. तसेच 16 कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग क्र. 2 पेंधर ते तळोजा एमआयडीसी दरम्यान नियोजित असून कळंबोली आणि कामोठे मार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत या मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.
मागील दोन वर्षांच्या कालावधीत मेट्रो सेवेच्या प्रवासी संख्येने गाठलेला एक कोटींहून अधिक आकडा हा मेट्रो सेवेला लाभत असलेला प्रवाशांच्या उदंड प्रतिसादाचे प्रतीक आहे. या मेट्रो मार्गामुळे बेलापूर, खारघर व तळोजा परिसरातील कार्यालये, गृहसंकुले व उद्योग-व्यवसाय यांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी लाभली आहे. नवी मुंबईकरांनी सिडकोच्या मेट्रो सेवेप्रति दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. - विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai