पनवेल महापालिकेचे अक्षय उर्जा प्रोत्साहन उपक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 37
पनवेल ः पर्यावरण संवर्धनासोबत ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने पनवेल महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सौर उर्जेच्या वापराची जोरदार सुरुवात केली आहे. ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ अंतर्गत ‘अक्षय ऊर्जा प्रोत्साहन’ उपक्रमाचा सोमवारी शुभारंभ खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आला. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या दोन दिवसीय उपक्रमाचा उद्देश नागरिक आणि विद्यार्थी वर्गामध्ये अक्षय ऊर्जेचे महत्त्व, ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि हरित उपक्रमांविषयी जागृती निर्माण करणे हा आहे.
पनवेल महापालिका स्वतः प्रशासकीय इमारतींवर 400 केडब्ल्यूपी क्षमतेचे सौर संयंत्र वापरून उर्जेची निर्मिती करत आहे. पनवेल महापालिकेने प्रशासकीय तसेच सार्वजनिक इमारतींवर सौर ऊर्जेची अंमलबजावणी सुरू केली असून, पनवेल शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, विलासराव देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्स,अग्निशमन दल केंद्राची इमारत, खारघर येथील आयुक्तांचे निवासस्थान, ऑडीटोरीयम, पनवेल शहरातील उर्दू शाळेची इमारत तसेच कामोठे येथील सेक्टर 8 मधील आरोग्य केंद्र अशा महत्त्वाच्या ठिकाणी महापालिकेने सौर उर्जेची यंत्रणा बसविली आहे. या संयंत्रांमधून सुमारे 400 किलोवॅटपीक (केडब्ल्यूपी) एवढ्या क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिती होत असून तिचा उपयोग दैनंदिन वीज वापरासाठी प्रभावीपणे होत आहे. ‘अक्षय ऊर्जा प्रोत्साहन’ कार्यक्रमांतर्गत घराघरापर्यंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महापालिकेला अक्षय उर्जेचे महत्व पटवून द्यायचे आहे. यामुळे पर्यावरण विषयक निबंध लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चर्चासत्र आणि तज्ज्ञ मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता वाढविण्यासाठी ई वेस्ट संकलन मोहिम, लघुपट प्रदर्शन आणि वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या शुभारंभावेळी शाळेच्या प्राचार्या निशा नायर आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या सूचनेनुसार सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत हा उपक्रम विद्यालयात राबविण्यात येत आहे.
“ऊर्जा वाचवा पर्यावरण वाचवा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालय, ओवेपेठ येथेही हा कार्यक्रम महापालिकेने आयोजित केला. अक्षय उर्जा वापराला प्रोत्साहन देत महापालिका हरित विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी बसथांबे, खारघर येथील स्कायवॉक 630, कामोठे समाज मंदीर 35 किलोवॅट, रोडपाली येथील आंबेडकर भवन अशा सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी सौरउर्जा यंत्रणा उभारण्याचे नियोजन केले आहे. महापालिका क्षेत्रातील पथदिवे आणि हायमास्ट सौरउर्जेचे बसविण्याचे नियोजन आहे. पनवेलच्या रहिवाशांनीही सौरउर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी पर्यावरण रक्षणासाठीची ही जनजागृती महापालिकेकडून केली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai