कंडोमिनियम अंतर्गत पालिका देणार सुविधा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2025
- 98
मलनिःस्सारण व पाणीपुरवठ्याच्या कामांकरिता 430.51 कोटींचा निधी मंजूर; 55 चौ.मी पर्यंतच्या घरांना लाभ
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका हद्दीत सिडकोने उभारलेल्या वसाहतींमध्ये नागरी सुविधा पुरविण्याचा पालिकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यापूर्वी 300 चौरस फुटांपर्यत घरांचा आकार असलेल्या वसाहतींमध्येच नागरी सुविधा पुरविण्याची परवानगी पालिकेला होती. मात्र आता राज्याच्या नगरविकास विभागाने 550 चौरस फूट आकाराची घरे असलेल्या 7 नोडमधील सिडको वसाहतींमध्ये मलनिस्सारण तसेच जलवाहिन्यांची कामे करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच ही परवानगी देताना 430.51 कोटी रुपयांचा विशेष निधीदेखील नगरविकास विभागाने मंजूर केला आहे.
नवी मुंबईत सिडकोने उभारलेल्या बैठ्या चाळी, इमारती आणि कंडोमिनियम वसाहतींमध्ये राहताना नागरिकांना मुलभूत नागरी सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सिडकोने सुरुवातीला या वसाहतींची देखभाल ओनर्स असोसिएशनकडे सोपवली. पण मलनिस्सारणाच्या जुन्या व खराब झालेल्या लाईन्स, गळती असलेल्या जलवाहिन्या, नियमित साफसफाईची अपुरी व्यवस्था, मोठ्या दुरुस्तींसाठी लागणारा प्रचंड खर्च ही सर्व कामं ओनर्स असोसिएशनच्या आवाक्याबाहेरची होती. सिडकोच्या नियमांमुळे नवी मुंबई महापालिकेला या वसाहतींमध्ये नागरी सुविधा देता येत नव्हत्या, कारण अट फक्त 300 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मर्यादित होती. त्यामुळे जवळपास 70% वसाहतींना महापालिकेच्या सुविधा मिळत नव्हत्या.
गेल्या वर्षभरापासून ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी हा विषय नगरविकास विभागाकडे मांडण्यास सुरुवात केली होती. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत या प्रश्नावर काही बैठकाही घेण्यात आल्या. या बैठकांनंतर राज्य सरकारने सप्टेंबर 2025 मध्ये शहरातील सिडको वसाहतींमध्ये मलनिःस्सारण व पाणीपुरवठ्याची कामे करण्यास महापालिकेस परवानगी दिली. मात्र 300 चौरस फुटांपर्यत आकारमान असलेल्या घरांच्या वसाहतींपुरतीच ही परवानगी मर्यादित असल्याने शहरातील 70 टक्क्यांपेक्षा अधिक वसाहतींना सरकारच्या या निर्णयाचा फायदा झाला नव्हता. त्यामुळे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नावर पुन्हा फेरआढावा बैठक घेण्यात आली. अखेर राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या एका आदेशानुसार शहरातील 550 चौरस फुटांपर्यत घरांचे आकारमान असलेल्या सर्वच बैठी आणि इमारती असलेल्या वसाहतींमध्ये मलनिस्सारण आणि पाणी पुरवण्याची कामे करण्याकरिता महापालिकेस परवानगी देण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार पालिका क्षेत्रातील कंडोमिनियम अंतर्गत 30.02 चौ.मी वरील व 55.00 चौ.मी क्षेत्रफळापर्यंतची बैठी घरे व इमारतीसाठी 172.96 कोटी तसेच 55.00 चौ.मी क्षेत्रफळापर्यंतची बैठी व इमारतीमधील सर्व घरे यात मलनिःस्सारण व पाणीपुरवठ्याची कामे करण्याकरिता 257.55 कोटी खर्च अपेक्षित आहे. तो प्रथमतः नवी मुंबई महापालिकेने स्वनिधीतून करुन नंतर सदरचा खर्च सदनिकाधारकांकडून घरांचे पुनर्विकास करतेवेळी पालिकेस वसूल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या सुधारित आदेशामुळे शहरातील सर्वच सिडको वसाहतींना मोठा दिलासा मिळाला आहे.
नगरविकास विभागाने अखेर सुधारित अध्यादेश काढून 550 चौरस फुटांपर्यंतच्या सर्वच सिडको वसाहतींना नागरी सुविधा देण्याची अधिकृत परवानगी नवी मुंबई महापालिकेला दिली. आता नवीन मलनिस्सारण लाईन्स, नवीन जलवाहिन्या, साफसफाई व्यवस्था, आवश्यक नागरी सुविधांची कामं सर्व काही महापालिका करणार आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक ताण आणि गैरसोयींमधून मुक्ती मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जनतेसाठी घेतलेला संवेदनशील निर्णय नवी मुंबईच्या विकासाला नवं बळ देणारा आहे. - खा. नरेश म्हस्के,
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai