दीड वर्षात 937 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 06, 2025
- 105
पदोन्नती, आश्वासित प्रगती, अनुकंपा, लाड-पागे वारसा हक्क लाभ
नवी मुंबई ः लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी महापालिकेशी संबंधित विविध लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यावर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे विशेष लक्ष आहे. या कार्यवाहीत महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा महत्वाचा वाटा आहे. पावणे दोन वर्षात 378 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली असून 515 जणांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे.
त्या अनुषंगाने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अधिकारी, कर्मचारी हिताच्या प्रशासकीय बाबींकडे विशेष लक्ष दिले आहे. याकरिता अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय बाबींकरीता विशेष समिती गठीत करण्यात आली असून प्रशासन विभागाचे उपआयुक्त सदस्य सचिव असलेल्या या समितीमार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचा नियमीत आढावा घेतला जात आहे. यामुळे अधिकारी-कर्मचारीवृंदाचे अनेक वर्षे प्रलंबित असलेले पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना असे विषय मार्गी लागले आहेत. यामध्ये मार्च 2024 ते नोव्हेंबर 2025 या पावणे दोन वर्षांच्या कालावधीत 378 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली असून याव्दारे बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या पदोन्नती विषयाला गती मिळाली आहे. या मोठया प्रमाणात झालेल्या पदोन्नतीमुळे वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळाली असून त्यांना पदोन्नती मिळाल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांचाही पुढील प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे. पदोन्नतीत गट ‘अ’ मधील 42, गट ‘ब’ मधील 122, गट ‘क’ मधील 214 अशा एकूण 378 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. त्याचप्रमाणे मार्च 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत 515 इतक्या मोठया संख्येने अधिकारी, कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. यामध्ये गट ‘अ’ मधील 48, गट ‘ब’ मधील 7, गट ‘क’ मधील 389 आणि गट ‘ड’ मधील 71 अशा एकूण 515 अधिकारी, कर्मचारी यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. यामुळे पदोन्नती पासून वंचित राहिलेल्या अधिकारी, कर्मचारीवृंदाला दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या कार्यालयीन रुक्ष कामकाजातही संवेदनशीलता जपत मार्च 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत अनुकंपा तत्वावर 33 उमेदवारांना महानगरपालिका सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लाड-पागे समितीच्या वारसा हक्क शिफारसीनुसार गट क संवर्गात एका उमेदवारास रोखपाल पदावर व गट ड संवर्गात 11 उमेदवारांना सफाई कामगार पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे.
याशिवाय 150 दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत सरळसेवेच्या कोटयातील गट ‘अ’ ते गट ‘ड’ या संवर्गाच्या सर्व बिंदू नामावली नोंदवहया तपासणीसाठी शासनास व सहाय्यक आयुक्त, मागासवर्ग कक्ष यांना सादर करण्यात आलेल्या आहेत. कामकाजात अधिक सुनियोजितता आणण्यासाठी सुशासनाच्या दृष्टीकोनातून भांडवली गुंतवणूकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना 2025 या अंतर्गत अभियांत्रिकी व तांत्रिक संवर्गांची सुधारित संरचना, आकृतीबंध व आवश्यक सेवा अर्हता याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये कार्यवाही सुधारणेच्या दृष्टीने नवीन कक्ष निर्माणाचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. या कक्षांमध्ये पाणीपुरवठा व मोरबे मुख्यालय कक्ष, दक्षता व गुणवत्ता नियंत्रण कक्ष, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, आर्थिक नियोजन कक्ष, जीआयएस कक्ष, वाहतूक नियोजन कक्ष सुरु करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai