महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाला नवे मानांकन
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 27, 2025
- 108
ओल्या कचऱ्याच्या खताला ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रँड
नवी मुंबई ः शहरात निर्माण होणारा ओला कचरा व सुका पालापाचोळा या विघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करुन तयार होणाऱ्या सेंद्रिय खताची विपणन व विक्री करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘हरित महासिटी कंपोस्ट’ हा अधिकृत राज्य-नोंदणीकृत ब्रँड आहे. नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी ओल्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या खताच्या विपणन व विक्रीकरीता हा हरित ब्रँड वापरण्यास परवानगी मिळाली आहे. यामुळे देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीत समाविष्ट असणाऱ्या नवी मुंबई शहराला आणखी एक विशेष मानांकन लाभले आहे.
“हरित महासिटी कंपोस्ट” हा ब्रँड महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकाराने शहरी ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा प्रचार व विपणन करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. हा ब्रँड राज्य कचरा व्यवस्थापन नियम तसेच खत नियंत्रण आदेश अंतर्गत निर्धारित केलेल्या गुणवत्ता मानकांचे काटेकोरपणे पालन करतो. नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी निर्माण होणारे सेंद्रिय खत त्या गुणवत्तेचे ठरले आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेच्या कचऱ्यापासून निर्माण होणारे खत हे आता “हरित महासिटी कंपोस्ट”या विशेष ब्रँडने ओळखले जाणार आहे.
या ब्रँडव्दारे उच्च दर्जाचे सेंद्रिय खत विक्रीसाठी उपलब्ध करून देता येणार असून, क्षेपणभूमीमध्ये जाणारा कचरा लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होत आहे. तसेच मातीची सुपिकता वाढवून, वनस्पतींचे आरोग्य सुधारण्यातून शाश्वत शेतीला चालना मिळत आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे क्षेपणभूमी येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये नागरी घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन दैनंदिन सरासरी 30 ते 40 मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येत आहे. या सेंद्रिय खताचा वापर नवी मुंबई पालिकेच्या उद्यानांमध्ये केला जात आहे. तसेच हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यातून शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक व गुणवत्तापूर्ण खताचा लाभ होत आहे.
नवी मुंबई महापालिका पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्नशील असून, त्यामध्ये नवी मुंबई पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या खतास “हरित महासिटी कंपोस्ट“ ही ब्रॅण्डेड ओळख प्राप्त झाल्याने ही नवी मुंबई महापालिकेसाठी विशेष उल्लेखनीय अभिमानाची गोष्ट आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai