‘हेटवणे जलवर्धन’ बोगदा खोदण्याची अद्वितीय कामगिरी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 30, 2025
- 113
जटिल आव्हानांवर सिडको आणि ॲफकॉन्स यांनी केली मात
नवी मुंबई ः हेटवणे पाणी पुरवठा योजनेतील अत्यंत प्रतिकूल अशा भूगर्भशास्त्र आणि अभियांत्रिक विषयक आव्हानांवर मात करून सिडकोने दि. 29 डिसेंबर 2025 रोजी पहिल्यांदाच बोगदा खोदण्याच्या कामासंदर्भात अद्वितीय कामगिरी करून इतिहास रचला. सिडकोच्या आजवरच्या प्रकल्पांपैकी बोगदा खोदण्याच्या कामासंर्भात पहिल्यांदाच अशाप्रकारे ऐतिहासिक कामगिरी करण्यात आली आहे. या कामगिरीचे यश साजरे करण्यातकरिता प्रकल्पस्थळी विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, शीला करूणाकरन, मुख्य अभियंता (न.मु.आं.वि. व वि. प्र.), सिडको, प्रवीण सेवतकर अधीक्षक अभियंता (पाणी पुरवठा), सिडको यांसह सिडकोच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि ॲफकॉन्समधील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातत्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबईतील पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्याकरिता सिडकोतर्फे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत प्रक्रियारहित पाण्याकरिता 13.25 किलोमीटरचा तर शुद्ध पाण्याकरिता 15.4 किलोमीटरचा बोगदा उभारण्यात येणार आहे. सदर काम पूर्ण झाल्यानंतर सिडकोला सध्याच्या 150 एमएलडी ऐवजी 270 एमएलडीचा वाढीव पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. सिडकोच्या जलबोगदा पॅकेज-1 अंतर्गत वहाळ गावातील शाफ्ट-4 येथे ही ऐतिहासिक कामगिरी पार पाडण्यात आली. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे पॅकेज-1 ची अंमलबजावणी करण्यात येत असून यामध्ये शुद्ध पाण्यासाठी 8.7 किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्यात येणार असून त्यापैकी 5.52 किलोमीटर बोगदा खोदण्याचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
सिडकोतील अभियंते आणि ॲफकॉन्सच्या टीमने अनेक भूगर्भशास्त्रीय, अभियांत्रिकी आणि निजोयनविषयक आव्हानांवर मात करून बोगदा खोदण्याची ही ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आहे. जमिनीखाली अंदाजे 100 मीटरवर हा बोगदा खोदण्यात आला. बोगद्याचा मार्ग हा दक्षिणेतील सह्याद्रीच्या प्रदेशातील भरित कुहरी (अमिग्डॉइडल) बेसाल्टसारख्या जटिल भूरचनांमधून जाणारा होता. जागेच्या मर्यादेमुळे साधनांची उभारणी करणे व हालचाल करवणे कठीण बनले होते. तसेच अशाप्रकारच्या बोगदा खोदण्याच्या कामी मकिंगकारची हालचाल करवणे आव्हानात्मक होते. परंतु सिडकोतील अभियंते आणि ॲफकॉन्सची टीम यांच्या परस्पर समन्वय आणि प्रयत्नांद्वारे या आव्हानांवर यशस्वीरीत्या मात करण्यात आली. यापूर्वी, या प्रकल्पांतर्गत ॲफकॉन्सतर्फे 3.2 मीटर व्यासाचे टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) फ्लेमिंगोचा वापर करून एक महिन्याच्या कालावधीत, 777 मीटरचा बोगदा खोदून एक नवीन राष्ट्रीय विक्रम रचण्यात आला. या कामगिरीद्वारे या वर्षीच्या मे महिन्यामध्ये 714 मीटरचा बोगदा एका महिन्यामध्ये खोदून केलेला ॲफकॉनचाच विक्रम मोडित निघाला.
अनेक आव्हानांवर मात करून पार पाडलेल्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मी सिडको तसेच ॲफकॉनच्या टीमचे मनापासून अभिनंदन करतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पूर्ण केल्यानंतर केवळ काही महिन्यांतच सिडकोने ही दुसरी लक्षणीय कामगिरी केली आहे. सन 2050 पर्यंत नवी मुंबई क्षेत्राकरिता अपेक्षित असलेली पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सिडकोतर्फे विविध पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यांपैकी हेटवणे जलवर्धन योजनेतील जलबोगद्याचे काम ही सर्वांत आव्हात्मक कामगिरी आहे. उर्वरित बोगदा खोदण्याचे काम देखील नियोजित वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे सिडकोच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होऊन नवी मुंबईला वाढीव पाणी पुरवठा करण्याकरिता मदत होणार आहे. -विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai