मुंबई अन्वेषणा विज्ञान व अभियांत्रिकी मेळावा उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 10, 2026
- 53
नवी मुंबई : अगस्त्य आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठान आणि सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अन्वेषणा 2025-26 मुंबई विज्ञान व अभियांत्रिकी मेळावा नेरूळ येथील देवाडिगा भवन येथे 7 व 8 जानेवारी 2025 रोजी उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
या दोन दिवसीय मेळाव्यात शालेय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपल्या मार्गदर्शक प्राध्यापकांच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञानाधारित व समाजोपयोगी प्रकल्पांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती, सर्जनशीलता तसेच समस्या सोडवण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कालावधीत परिसरातील इयत्ता पाचवी ते दहावीतील 1,200 हून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरचे संचालक डॉ. राजकुमार आवसरे उपस्थित होते. तसेच भाभा अणुसंशोधन केंद्राचे वैज्ञानिक अधिकारी निखिलेश, टेकअक्ष व विटब्लॉक्सचे संस्थापक तसेच रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, लंडनचे फेलो अमित मोदी, सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रिसर्चचे कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व प्रमुख ध्रुमित व्यास, नवी मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी अशोक कडूस, नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा भारगरे तसेच वाधवानी प्रतिष्ठानचे वरिष्ठ व्यवस्थापक केदार कुलकर्णी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय अगस्त्य आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानचे प्रतिनिधी विक्रांत सोलंकी, पराग सावंत व रमेश हितनल्ली यांचीही उपस्थिती लाभली. स्पर्धेचे परीक्षण डॉ. दीपक रासकर (अमिटी विद्यापीठ), डॉ. तुषार घोरपडे (रामराव आदिक अभियांत्रिकी महाविद्यालय), हिरन ठक्कर व ईश्वर पैकराव यांनी केले.
स्पर्धेत विवा इन्स्टिटूट ऑफ टेक्नॉलॉजी, विरार येथील मॅटर्निटी केअर सिस्टिम या प्रकल्पास प्रथम पारितोषिक, पी. व्ही. जी. अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक यांना द्वितीय, सेंट फ्रान्सिस इन्स्टिटूट ऑफ टेक्नॉलॉजी, बोरीवली यांना तृतीय, मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग, मुंबई यांना चतुर्थ, तर विवा इन्स्टिटूट ऑफ टेक्नॉलॉजी, विरार यांच्या ऍग्री सेतू या प्रकल्पास पंचम पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच पाच प्रकल्पांना प्रशंसापत्र पारितोषिक आणि शंभर वेळा जिज्ञासू प्रश्न विशेष पुरस्कार देण्यात आला. अशा प्रकारे एकूण अकरा पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
समारोपप्रसंगी अल्पेश गज्जर यांनी उपस्थित मान्यवर, परीक्षक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांचा उत्साह, मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आणि आयोजकांचे उत्कृष्ट नियोजन यामुळे हा विज्ञान व अभियांत्रिकी मेळावा अत्यंत यशस्वी ठरला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai