निम्म्या करदात्यांकडून 1787 कोटींचा कर थकीत
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2026
- 22
पालिकेपुढे मालमत्ता कर वसुलीचे आव्हान
पनवेल ः महानगरपालिका मुख्यालय: मालमत्ता कर वसुलीसाठी प्रशासनाकडून प्रभाग निहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराचा प्रश्न सुटण्यासाठी मागील वर्षी जुलै महिन्यात जाहीर केलेल्या शास्ती सवलतीच्या अभय योजनेनंतरही यंदाच्या आर्थिक वर्षात पनवेल महापालिकेसमोर 1787 कोटी रूपयांचा मालमत्ता कर वसुलीचे आव्हान आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात 3,60,462 करदाते आहेत. यापैकी 2,01,736 करदात्यांनी कर भरलाच नाही. त्यामुळे निम्यापेक्षा अधिक करदात्यांचे कर भरण्यासाठी महापालिका प्रशासनाला झटावे लागणार आहे. महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी प्रशासक काळात जुलै ते डिसेंबर या महिन्यात मालमत्ता करामध्ये करदात्यांना दिलासा मिळावा यासाठी शास्ती सवलतीची अभय योजना जाहीर केली. या योजनेनंतर 517.08 कोटी रूपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. मात्र अजूनही खारघर व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कोट्यावधी रूपये करदात्यांनी थकीत ठेवले आहेत. मागील वर्षी 2330 कोटी रूपयांची एकुण मालमत्ता कराची वसुली होती. यापैकी सवलतीच्या रकमेसह एकुण वसूली 660 कोटी रूपये झाली. मात्र अजूनही 1787 कोटी रूपये वसूलीसाठी मार्च महिन्याच्या अखेरीस महापालिका प्रशासन आणि सभागृहातील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना पनवेलकरांनी थकीत कर का भरावा हे पटवून द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांनी महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये भारतीय जनता पक्षाने पनवेलकरांना दिलेल्या आश्वासनपत्रात मालमत्ता करांचे दर वाढविणार नसल्याचे स्पष्ट केल्याने महापालिकेला पुढील आर्थिक वर्षात कराच्या दरात वाढ करण्यामध्ये मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे थकीत करवसूलीवर महापालिकेला त्यांचे आर्थिक आराखडे उभारावे लागणार आहेत.
या दरम्यान पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना मालमत्ता कराच्या थकीत वसुलीसाठी जोरदार आखणी सुरू केली आहे. महापालिकेच्या कर विभागात प्रभाग निहाय कर्मचारी व अधिकाऱ्यांची पथके स्थापन करून थकीत कर ठेवणाऱ्या करदात्यांच्या मालमत्तांपर्यंत महापालिका पोहचणार आहे. 11 मार्चपर्यंत महापालिकेचे कर विभाग करदात्यांना वर्तमान पत्रामध्ये थकीत कर भरण्याचे आवाहन करेल. त्यानंतरही मोठी रक्कम थकविणाऱ्या करदात्यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा महापालिकेचे नियोजन आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai