अर्बन हाट मध्ये ‘नॅशनल गांधी शिल्प बाजार’ महोत्सव
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2026
- 35
नवी मुंबई : भारतीय हस्तकलेची परंपरा अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण असून कारागिरांच्या कष्टातून साकारलेल्या या कलेचे जतन आणि प्रोत्साहन करण्यासाठी ‘नॅशनल गांधी शिल्प बाजार’सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.
सीबीडी बेलापूर येथील अर्बन हाट येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल गांधी शिल्प बाजार’ या सर्व-भारतीय हस्तकला महोत्सवाचे उद्घाटन मंत्री सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयाच्या प्रायोजक तत्वाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 6 ते 15 मार्च 2026 या कालावधीत होणाऱ्या या भव्य प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित यांच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी बोलताना सावकारे म्हणाले की, भारतातील पारंपरिक हस्तकला ही देशाच्या सांस्कृतिक वारसेचा महत्त्वाचा भाग आहे. भारतात आढळणारी कलाकुसर जगातील इतर कोणत्याही ठिकाणी सहजपणे पाहायला मिळत नाही. आधुनिक यंत्रसामग्रीच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक हस्तकलेवर काही प्रमाणात परिणाम झाला असला, तरी या कलेमध्ये कारागिरांची मेहनत, कौशल्य आणि संस्कृतीची परंपरा दडलेली असते. त्यामुळे हस्तकला वस्तू तयार करण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि त्यांची किंमतही तुलनेने जास्त असते. मात्र ती किंमत कारागिरांच्या परिश्रमांची असते, असे त्यांनी नमूद केले. या प्रदर्शनात काही दिव्यांग कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचाही समावेश असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले. तसेच बेलापूर येथील अर्बन हाट उभारण्यासाठी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी अभिनंदन केले. श्री.सावकारे यांनी सिडको प्रशासनाला अर्बन हाट परिसरात आवश्यक दुरुस्ती व सुधारणा करण्याचे आवाहन केले. योग्य दुरुस्ती आणि देखभाल झाल्यानंतर ही जागा आणखी आकर्षक आणि उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे हाट विकसित करणे आवश्यक असून, त्यामुळे कारागिरांना त्यांच्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
‘नॅशनल गांधी शिल्प बाजार’ या उपक्रमांतर्गत देशभरातील सुमारे 150 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनात देशातील विविध राज्यातील सुमारे 150 कारागिरांनी सहभाग नोंदवला असून शिल्पगुरू, राष्ट्रीय व राज्य पुरस्कारप्राप्त तसेच नामवंत कारागिरांनी सादर केलेल्या विविध पारंपरिक हस्तकला वस्तू येथे उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात आर्ट मेटल वेअर, बांबू व काठी उत्पादने, गालिचे, शंख-शिंपला हस्तकला, बाहुल्या व खेळणी, भरतकाम, काच हस्तकला, ज्यूट हस्तकला, तंजावर चित्रकला, लाकडी उत्पादने तसेच कोल्हापुरी चप्पल अशा विविध वस्तू नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनामुळे देशभरातील कारागिरांना आपली कला सादर करण्यासाठी आणि विक्रीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमास प्रधान सचिव (वस्त्रोद्योग)अंशु सिन्हा, सह व्यवस्थापकीय संचालक सिडकोचे शंतनू गोयल, संचालक डॉ. अजित खैरे,प्रादेशिक संचालक दिपांशू हलदरे, दिपक खांडेकर प्रशासक (महाटेक), पोलीस उपमहानिरीक्षक (सीआरपीएफ) रविंद्र सिंग आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहायक संचालक (हस्तकला) चंद्रशेखर सिंग यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai