पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 60 वर्षे!
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 13, 2026
- 29
नवी मुंबई महापालिका सेवा विनिमय 2026 स्थायी समिती सभेत मंजूर
नवी मुंबई ः महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 465 (1 ब ते ल) नुसार तयार करण्यात आलेले नवी मुंबई महापालिका सेवा विनिमय 2026 बुधवारी झालेल्या पालिकेच्या पहिल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सुधारणा आणि सूचनांसह मंजूर करण्यात आले. या नवीन सेवा विनिमय नुसार महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करण्यात आले आहे. सभागृह नेते तथा स्थायी समितीचे सदस्य सागर नाईक यांनी या संबंधीचा ठराव मांडला होता. समिती सदस्यांच्या सूचनासह मंजुर केलेला हा ठराव अंतिम मान्यतेसाठी महापालिकेच्या सर्व साधारण सभेमध्ये मांडण्यात येणार आहे.
प्रशासन शिस्त, पारदर्शकता, उत्तरदायित्व, कार्यक्षमता आणि नैसर्गिक न्याय या तत्त्वांवर हे सेवा विनिमय आधारित आहेत. सुरक्षा ठेव आणि आर्थिक उत्तरदायित्व, रजा नियम व संचय मर्यादा, सेवा कालावधी व निवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, शिस्त व विभागीय चौकशी प्रक्रिया, प्रवास व दैनंदिन भत्ता संरचना, भविष्य निर्वाह निधी योगदान व्यवस्था, आचारसंहिता व हितसंबंध संघर्ष नियंत्रण आणि प्रशासनिक अहवाल व निरीक्षण प्रणाली अशा बाबींचा या सेवा विनिमय मध्ये समावेश आहे. गेल्या काही वर्षात महापालिकेचे अनुभवी कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा महापालिका आणि पर्यायाने शहर हितासाठी होत नाही. या शहराबरोबर नाळ जुळलेल्या अधिकाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत असून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. अधिकारी, कर्मचारी यांची दुसरी फळीच पालिकेत निर्माण झाली नाही, अनुभवाची ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या विकासासाठी व्हावा यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सेवाकाळ वाढवून त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करण्याचे प्रस्तावित केल्याची माहिती सागर नाईक यांनी दिली. महापालिका अधिनियमानुसार अशा प्रकारचे सेवा विनिमय करण्याचे अधिकार स्थायी समितीला असून महासभेकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
या ठरावावरील चर्चेदरम्यान उपस्थित अतिरिक्त आयुक्त पवार यांनी या ठरावावर अभ्यास करुन, शासनाच्या मान्यतेची गरज आहे का याची पडताळणी करुन, अधिकाऱ्यांचे मत विचारात घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. मात्र सागर नाही यांनी हा स्थायी समितीचा अधिकार असून शासन मान्यतेचा प्रश्न नसल्याचे सांगितले. तसेच शासनाच्या निर्देशानुसार नाही तर अधिनियमांनुसार अधिकाऱ्यांनी महापालिकेसाठी काम करावे असेही नाईक म्हणाले.
सेवा विनिमय मध्ये पालिकेत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी व ठोक मानधनावरील कामगारांचाही समावेश करावा, त्यांनाही यातील सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी सरोज पाटील यांनी केली. तर स्वाती गुरखे यांनी प्रसुती रजा सहा महिन्यांपेक्षा अधिक किमान नऊ महिने मिळावी अशी सूचना केली. सर्व सुधारणा व सूचनांसह सदर प्रस्ताव स्थायी समितीने मंजुर केला असून पुढील अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai