जेएनपीए-मुंबई ई-स्पीड बोट लवकरच सेवेत
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 13, 2026
- 31
उरण ः रस्ते,रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तसेच वेळेत बचत करुन प्रवास व्हावा यासाठी जेएनपीएने जेएनपीए-मुंबई या सागरी प्रवासासाठी ई-स्पीड बोटचा पर्याय निवडला आहे. सध्या या ई-स्पीड बोटींची चाचणी करण्यात येत आहे. ही चाचणी आणखी आठवडाभर होणार आहे. यात स्पीड बोटींचा वेग, प्रवासी वाहतुकीची क्षमता, तांत्रिक अडचणी आणि इतर समस्या तपासण्यात येणार आहेत. या चाचण्या यशस्वीरीत्या झाल्यानंतरच ही सेवा सुरू होईल, अशी माहिती जेएनपीए प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होऊनही ई-स्पीड बोट सेवा सुरू झालेली नाही. या बोटीचे प्रात्यक्षिक एकदा झालेले आहे, मात्र आता या महिन्यात पुन्हा एकदा प्रात्यक्षिक होणार आहे. जेएनपीएने माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला बोटी पुरवठा व हाताळणीच्या कामाचे कंत्राट दिले आहे. जेएनपीएकडून यासाठी 37 कोटी 89 लाख 94 हजार 190 रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. जेएनपीए बंदरात विविध प्रकारच्या पर्यावरण व हरित ऊर्जेवर भर दिला जात आहे. यात बंदरातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मुंबईत ये-जा करता यावे याकरिता जेएनपीए ते गेट वे ऑफ इंडिया अशी जलसेवा सुरू आहे. या सेवेच्या आधुनिकीकरणासाठी प्रदूषणविरहित ई-स्पीड बोट सेवा सुरू करण्यात आहे.
जेएनपीएला जेएनपीए-मुंबई या सागरी प्रवासी मार्गावरील लाकडी प्रवासी बोट सेवेचा खर्च परवडेनासा झाला. तसेच प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या जुनाट लाकडी बोटीही खर्चीक व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही उपयुक्त नसल्याने जेएनपीएचे माजी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी तासाचा प्रवास अगदी 35-40 मिनिटांतच होणाऱ्या ई-स्पीड बोटीचा पर्याय निवडला होता. प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल्या दोन ई-स्पीड बोटींचे कंत्राट माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला बोटी पुरवठा व हाताळणीचे काम देण्यात आले होते. दहा वर्षे ई-स्पीड बोटींची सेवा पुरवण्यासाठी जेएनपीएने 37 कोटी 89 लाख 94 हजार 190 रुपये खर्चाची तरतूदही केली आहे. उन्हाळी हंगामात 20-25 प्रवासी व पावसाळी हंगामात 10-12 क्षमतेच्या दोन स्पीड बोटीतून ही वाहतूक करण्यात येणार आहे. ही सेवा लवकरच सुरू होणार असल्याने येथील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
ई-स्पीड बोटींची चाचणी करण्यात येत आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर जेएनपीए प्रशासनाकडून खात्री करून घेतल्यानंतर ही सेवा सुरू केली जाणार आहे.- बाळासाहेब पवार, नियंत्रक कॅप्टन, मुख्य जलवाहतूक, जेएनपीए
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai