पालिकेचा एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 13, 2026
- 24
पनवेल : पनवेल महापालिकेने 14 वर्षे वयोगटातील मुलींकरीता एचपीव्ही (ह्युमन पॉपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीमेचा शुभारंभ रविवारी (8 मार्च) केला. एचपीव्ही लसीकरण म्हणजे मुलींच्या भविष्यातील आरोग्याचे संरक्षण आहे. म्हणूनच महिला दिनाचे औचित्य साधून गावदेवी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एचपीव्ही लसीकरण ही देशव्यापी मोहीम आहे. एचपीव्ही विषाणूमुळे प्रजनन मार्गात एक सामान्य संसर्ग होतो. गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या बहुतांश रुग्णांमध्ये एचपीव्ही जबाबदार असतो. जगभरात आतापर्यंत 50 कोटींहून अधिक महिलांना ही लस देण्यात आलेली आहे. एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा उद्देश गर्भाशयमुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्याचा आहे. ही देशव्यापी मोहीम आहे. पनवेल पालिकेनेही या मोहिमेला सुरुवात केली आहे. उपमहापौर प्रमिला पाटील, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, महापालिका सदस्य दर्शना भोईर, अजय बहिरा, प्रिती जॉर्ज, प्रतिभा भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत गावदेवी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉ. गणेश नायर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होते. पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सर्व 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 3 महिने ही मोहीम राबवली जाणार आहे. पुढील 3 महिन्यांपर्यंत म्हणजेच मे 2026 पर्यंत एचपीव्ही लस दिली जाईल.
एचपीव्ही लसीकरण 14 वर्षे वयोगटातील (ज्यांनी 14 वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि 15 वर्षे पूर्ण केलेली नाहीत) मुलींना देण्यात येणार आहे. एकूण लोकसंख्येच्या एक टक्के लाभार्थी या मोहिमेतील अपेक्षित लाभार्थी असतील. महापालिकेकडून एचपीव्ही लसीकरणास सुरुवात झाली असून महापालिका क्षेत्रातील सर्व 14 वर्षे वयोगटातील मुलींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai