नव्या पिढीपर्यंत बाबासाहेब पोहचविण्यासाठी गीतसंगीत फ्युजन निर्मिती
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 07, 2026
- 21
रसिका व कृतिका बोरकर यांचे प्रतिपादन
नवी मुंबई ः नव्या पिढीपर्यंत बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार पोहचण्यासाठी आम्ही युवकांना आवडेल अशा गीतसंगीतातून बाबासाहेब मांडले. नव्या पिढीने जुनी गाणी ऐकावीत व समजून घ्यावीत याकरिता ती नवीन सुरावटींमध्ये गुंफली. स्वर आणि संगीतातून एखादी गोष्ट चांगल्या पध्दतीने सांगता येते व समोरच्याला पटकन समजते कारण त्यात भावना असतात अशा शब्दात श्रोत्यांशी सुसंवाद साधत रसिका आणि कृतिका या बोरकर सिस्टर्सनी मनात खोलवर रुजलेले व स्वरांमधून उमललेले बाबासाहेबांचे तत्वज्ज्ञान ठामपणे मांडले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त ऐरोली से.15 येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकात नवी मुंबई पालिकेच्या वतीने 3 ते 13 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर 2026’ या व्याख्यानमालेमध्ये सुप्रसिध्द गायिका रसिका व कृतिका बोरकर आणि गिटारिस्ट नयन बोरकर यांच्याशी पत्रकार विनोद राऊत यांनी दिलखुलास सुसंवाद साधला. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वडीलांकडून गायनाचे धडे मिळाले, कुटुंबातून प्रोत्साहन मिळाले व बाबासाहेबांची आणि बुध्दांची गाणी ऐकत ऐकत, त्यांचे विचार समजून घेत मोठया झालो असे सांगत शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर मुंबईत आलो आणि मुंबईने गायन क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आपुलकीचा आधार दिला अशा शब्दात त्यांनी आपला प्रवास सांगितला. बाबासाहेबांचे लिखाण वाचण्यासाठी बुध्दीमत्ता लागते त्यामुळे आधी महात्मा फुले यांची पुस्तके वाचावीत व पुढे बाबासाहेबांची पुस्तके वाचनाकडे वळावे असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला. बाबासाहेबांकडे जीवनाला योग्य दिशा देणारे ‘समुपदेशक’ म्हणून बघतो व ते ‘स्टाईल आयकॉन’ आहेत अशा शब्दात रसिका बोरकर यांनी बाबासाहेबांची आपल्या मनातली प्रतिमा मांडली.
कृतिका बोरकर यांनी बाबासाहेबांचे समाज उध्दारक विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकसंगीताचा मोठा वाटा असल्याचे सांगत बाबासाहेब स्वत: आवडीने तबला, व्हॉयलिन वाजविणारे ‘ग्रेट म्युझिशियन होते’ अशी वेगळी ओळख सांगितली. शास्त्रीय संगीत हे विपश्यना आणि ध्यानासाठी पूरक असल्याचे मत व्यक्त करीत शास्त्रीय संगीतातील ख्याल म्हणजे खयाल अर्थात विचार असल्याचे त्यांनी सांगितले. बौध्द धर्मात ध्यानाला अर्थात शांतीला महत्व असून स्तूपात, बौध्द लेण्यांमध्ये जाऊन बुध्दवंदना घ्यावी असेही त्या म्हणाल्या. बाबासाहेब वाचले पाहिजेत, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत व त्याचा अंगीकार केला पाहिजे असे सांगताना नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या बाबासाहेबांच्या अत्यंत देखण्या स्मारकातील ग्रंथालयातून पुस्तकांचा खजिना उपलब्ध करुन दिला आहे. त्याचा उपयोग जसा वेळ मिळेल तसा आम्ही करणार आहोत व इतर युवकांनीही येथे आवर्जून भेट देऊन पुस्तके वाचून बाबासाहेबांचे विचार जाणून घ्यावेत व ते आत्मसात करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी युवा पिढीच्या प्रतिनिधी म्हणून तरूणाईला संदेश देताना त्यांनी, जी गोष्ट करायला आवडते ती करुन बघा. त्यासाठी सोशल मिडीयाचा प्रभावी उपयोग करुन घ्या. त्यातून आपल्याला काय जमते आहे ते जाणून घ्या व त्यासाठी 100 % योगदान दया, असे सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai