नवी मुंबई विमानतळावर मॉकड्रिल संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 21
आपत्तींचा सामना करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचा आढावा
नवी मुंबई : आपत्कालीन स्थितीतील सुरक्षा व आपत्कालीन यंत्रणांची सज्जता तपासण्यासाठी दोन दिवसीय आपत्ती सज्जता सराव गुरुवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एनएमआयए) पार पडला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. संकटकाळात विविध विभागांनी एकमेकांशी समन्वय कसा राखावा आणि आपत्कालीन परिस्थितीशी कसा सामना करावा याबाबत हे मॉकड्रिल घेण्यात आले होते.
मॉकड्रिलची सुरुवात टेबलटॉप सरावाने करण्यात आली. यामध्ये संकटकाळात विविध विभागांनी एकमेकांशी समन्वय कसा साधावा व त्यांना, बचाव कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक उपकरणेे आणि विशेष वाहनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सरावाचा मुख्य भाग हा प्रत्यक्ष मैदानावर झालेला फुल-स्केल मॉक ड्रिल होता. यात चक्रीवादळ, आग लागणे आणि धोकादायक किरणोत्सर्गी पदार्थांची गळती अशा एकाच वेळी उद्भवणाऱ्या अनेक संकटांची कृत्रिम परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. अशा कठीण प्रसंगात लोकांचे सुरक्षित स्थलांतर, शोध व बचाव कार्य आणि आपत्कालीन कार्य संचालन केंद्रांची (ईओसी) तत्परता या निकषांवर सर्व यंत्रणांची कठोर चाचणी घेण्यात आली.
या सरावात केंद्राच्या एनडीआरएफ, सीआरपीएफ भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय), सशस्त्र दल आणि अणुऊर्जा विभाग (डीएई) आणि राज्य सरकारच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका , पनवेल महानगरपालिका, सिडको, सीआयएसएफ, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल आणि आरोग्य विभाग आदी संस्थांनी सहभाग घेतला. यासोबतच वैद्यकीय मदतीसाठी कळंबोलीचे व्हाईट लोटस हॉस्पिटल, वाशीचे फोर्टिस हॉस्पिटल आणि सीबीडी बेलापूरचे अपोलो हॉस्पिटल यांची विशेष पथके तैनात होती.
या प्रसंगी एनडीएमएचे डॉ. दिनेश कुमार अस्वाल, मेजर जनरल अजय वर्मा, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे उपस्थित होते. त्यांच्यासोबतच मुख्य सल्लागार डॉ. विनोद कौशिक, सारस सेठ (अणुऊर्जा विभाग), कोकण विभागाचे माहिती उपसंचालक मनोज सानप, पनवेलचे एसडीओ पवन चांडक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मॉकड्रीलमुळे विमानतळ परिसरातील सुरक्षिततेबाबतच्या संभाव्य त्रुटी ओळखून त्या दूर करण्यास मदत झाली असून, अति तीव्र हवामान किंवा तांत्रिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिसाद यंत्रणा सक्षम असल्याचा दावा एनएमआयएएलने केला आहे.
- नवी मुंबईत हवाई हल्ला
हवाई हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा आणि समाजाचा बचाव कसा करावा, याचे प्रत्यक्ष दर्शन देणारे थरारक हवाई हल्ला आणि ब्लॅक आऊट मॉकड्रिल गुरुवारी, दि.9 एप्रिल 2026 रोजी कोपरखैरणे येथे पार पडले. नवी दिल्ली महासंचालक आणि महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार, नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स), नवी मुंबई समूह, ठाणे कार्यालयामार्फत या प्रात्यक्षिक सरावाचे आयोजन करण्यात आले होते. कोपरखैरणे, सेक्टर-11, नवीमुंबई येथील माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदानावर दुपारी 4.55 वाजता या प्रात्यक्षिक सरावाला सुरुवात झाली. यात नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी हवाई हल्ल्यावेळी करायची कार्यवाही, जखमींवर प्रथमोपचार, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कवायती, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका (विमोचन) आणि उंच इमारतींवरून केले जाणारे हायराईज रेस्क्यू याचे अत्यंत शिस्तबद्ध प्रात्यक्षिक सादर केले.
या मॉक ड्रिलमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी (154) आणि होमगार्ड जवान (50), नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि आरोग्य विभागाची रुग्णवाहिका पथक, कोपरखैरणे, वाशी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेचे अग्निशमन दल (वाहनांसह), पोलीस बीडीडीएस () टीम आणि स्थानिक पोलीस प्रशासन, टी.डी.आर.एफ. टीम, आपत्ती व्यवस्थापन विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, पी.एम.श्री स्कूलचे 1 हजार 835 विद्यार्थी व कर्मचारी आणि सुमारे 2 हजार 500 स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai